महाराष्ट्र विधानसभेतील (VidhanSabha) २८८ निवडून आलेल्या आमदारांपैकी ६५% म्हणजेच १८७ आमदारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, यातील ४१% म्हणजे ११८ आमदारांवर हत्या, बलात्कार, अपहरण, महिलांवरील अत्याचार, आणि भ्रष्टाचार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या आरोपांची नोंद आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच यांनी जारी केलेल्या ताज्या अहवालात हा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
सर्वाधिक गुन्हे भाजप आमदारांवर
भाजपच्या एकूण १३२ आमदारांपैकी ९२ आमदारांवर (७०%) विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ४०% आमदार हे गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेले आहेत. शिवसेना (शिंदे गट)च्या ५७ आमदारांपैकी ३८ (६७%) आमदारांवर गुन्हे असून, त्यातील ४७% गंभीर स्वरूपाचे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ४१ पैकी २० (४९%) आमदारांवर गुन्हे दाखल आहेत, तर शिवसेना (ठाकरे गट)च्या २० पैकी १३ आमदार, काँग्रेसचे ९ आणि शरद पवार गटातील ५ आमदार गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सामील असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
महत्त्वाचे गुन्हे आणि गंभीर स्वरूप
गुन्ह्यांची व्याप्ती ही साध्या स्वरूपाच्या प्रकरणांपासून बलात्कार, हत्या, अपहरण आणि महिलांवरील अत्याचार यांसारख्या गंभीर स्वरूपापर्यंत आहे. निवडणूक जिंकून येणाऱ्या उमेदवारांची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी लोकशाही व्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभी करते.
भाजपचे ४०%, शिवसेना (शिंदे गट)चे ४७% आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ४९% आमदार गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांत सामील आहेत.
वाढती आर्थिक असमानता: करोडपती आमदारांची संख्या
महाराष्ट्र विधानसभेतील (VidhanSabha) मोठ्या प्रमाणावर आमदार हे करोडपती असल्याचे समोर आले आहे. अजित पवार गटाचे १००% आमदार करोडपती आहेत तर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट)चे ९८% आमदार करोडपतींच्या श्रेणीत येतात.
सर्वांत गरीब आमदार म्हणून काँग्रेसचे साजिद पठाण यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांची एकूण मालमत्ता केवळ ९ लाख रुपये आहे. याउलट, भाजपचे शाम खोडे (३१ लाख रुपये) आणि गोपीचंद पडळकर (६५ लाख रुपये) हेही तुलनेने कमी मालमत्तेचे आमदार आहेत.
विधानसभेत एकूण २२ महिला आमदार निवडून आल्या आहेत, परंतु हे प्रमाण अद्याप पुरेसे मानले जाऊ शकत नाही.
वयोमानानुसार सर्वांत ज्येष्ठ आमदार:*
- छगन भुजबळ (७७ वर्षे, राष्ट्रवादी काँग्रेस)
- दिलीप सोपल (७५ वर्षे)
- गणेश नाईक (७४ वर्षे)
सर्वांत तरुण आमदार:
- रोहित पाटील (२५ वर्षे, राष्ट्रवादी काँग्रेस)
- करण देवतळे (२९ वर्षे, भाजप)
- राघवेंद्र पाटील (३१ वर्षे, भाजप)
- वरुण देसाई (३२ वर्षे, शिवसेना – ठाकरे गट)
आकडेवारीमागील आव्हाने
या आकडेवारीमुळे महाराष्ट्रातील लोकशाही व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते. मतदारांपुढे गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना निवडून देण्याचा प्रश्न आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांच्या निवडीमुळे कायदा आणि सुव्यवस्था, तसेच प्रशासनातील नैतिकतेवर गडद छाया पडते.
मतदारांपुढील आव्हान
या अहवालामुळे मतदारांच्या जागरूकतेवर जोर देण्याची गरज अधोरेखित होते. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना रोखण्यासाठी कडक नियमांची आवश्यकता आहे.
हे पण वाचा “Nashik Vidhansabha Nivdanuki 2024: मतपेट्या सुरक्षित करण्यासाठी कडक सुरक्षा आणि हाय अलर्ट”