नावावर केलेली संपत्ती परत करावी लागणार
वृद्ध आई-वडिलांकडून मालमत्ता आपल्या नावावर करून घेतल्यानंतर किंवा भेट म्हणून अशी मालमत्ता मिळवल्यानंतर आई-वडिलांना सोडून देणाऱ्या मुलांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. प्रॉपर्टी मिळाल्यानंतर मुलांनी आई-वडिलांची देखभाल न केल्यास मालमत्ता परत करावी लागणार आहे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशांमुळे वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ मुलांना कोणत्याही परिस्थितीत करावा लागेल, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आई-वडिलांकडून मालमत्ता नावावर करून घेऊन किंवा भेट म्हणून मिळवून नंतर त्यांना वाऱ्यावर सोडणे मुलांना महागात पडू शकतं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
संपत्ती हस्तांतरण रद्द होणार
वृद्धांची परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. आता संपत्ती किंवा गिफ्ट देताना एक अट जोडली जाईल की मुलांनी आपल्या पालकांची योग्य काळजी घ्यावी. जर मुलांनी ही अट पाळली नाही आणि पालकांना दुर्लक्षित केले तर ती संपत्ती आणि गिफ्ट परत घेतली जाईल. संपत्तीचे हस्तांतर शून्य जाहीर केले जाईल. हा निर्णय वृद्ध पालकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी एक मोठे पाऊल ठरणार आहे.