लिस्बन, पोर्तुगाल – इस्माईली मुस्लिम समुदायाचे ४९ वे धर्मगुरू आणि प्रतिष्ठित परोपकारी, हिज हायनेस प्रिन्स करीम अल-हुसैनी, आगा खान(Aga Khan) IV यांचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आगा खान फाउंडेशन आणि इस्माईली धार्मिक समुदायाने त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा केली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
तरुणपणी घेतले धर्मगुरुपद, ६७ वर्षांचे नेतृत्व
१९५७ मध्ये वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी, हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेत असताना, त्यांना त्यांच्या आजोबांनी उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले. इस्माईली समुदायाने त्यांना “नव्या युगात वाढलेला तरुण” म्हणून स्वीकारले. त्यांच्या नेतृत्वाखाली इस्माईली समाजाने शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात भरीव प्रगती केली.
आगा खान (Aga Khan)डेव्हलपमेंट नेटवर्क आणि जागतिक विकासकार्य
आगा खान यांनी केवळ धार्मिक नेतृत्वच नाही, तर आगा खान (Aga Khan)डेव्हलपमेंट नेटवर्क (AKDN) च्या माध्यमातून जगभरात सामाजिक विकास कार्य केले. त्यांनी भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, ताजिकिस्तान आणि आफ्रिकन देशांमध्ये रुग्णालये, शाळा आणि घरे बांधण्यावर भर दिला. तसेच, आगा खान आर्किटेक्चर पुरस्कार स्थापन करून इस्लामी वास्तुशास्त्राच्या संवर्धनासाठी योगदान दिले.
ब्रिटनच्या राणीने दिला ‘हिज हायनेस’ किताब
१९५७ मध्ये, ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्यांना ‘हिज हायनेस’ हा सन्मान दिला. त्यांनी अनेक राष्ट्रप्रमुख आणि आंतरराष्ट्रीय संघटनांबरोबर काम करत इस्लाम आणि पाश्चात्य जगाच्या दरम्यान सांस्कृतिक पूल उभारला.
उत्तराधिकारी लवकरच जाहीर होणार
इस्माईली समुदायाच्या इतिहासातील ही महत्त्वपूर्ण घटना असून, त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा लवकरच केली जाईल. आगा खान यांच्या निधनाने इस्लामिक जगतातील एक महत्त्वाचे नेतृत्व हरपले आहे.