Attempted Murder– नाशिक तालुक्यातील गोवर्धन गावात शनिवारी रात्री महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किशोर पिराजी जाधव (५२, रा. राजवाडा) यांच्यावर जीवघेणा हल्ला (Attempted Murder) करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी पिस्तूलला धक्का दिल्याने गोळी हवेत सुटली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
तक्रारीवरून वाद, हल्लेखोरांनी घेतला निशाणा
गावातील एका प्रकरणावर पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून संशयितांनी जाधव यांच्यावर हल्ला केला. यामध्ये रोशन दिलीप जाधव, तुषार विठ्ठल कापसे, गौरव ऊर्फ बाळा जयराम माडे, राहुल दिलीप जाधव, अजय मनोज कापसे (सर्व रा. गोवर्धन) आणि त्यांच्या तीन साथीदारांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम १०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘…आता तुला मारूनच टाकतो’ – हल्लेखोरांचा धमकीचा सूर
शनिवारी रात्री जाधव कार्यालयासमोर बसले असताना हल्लेखोर टोळके तलवार, पिस्तूल आणि दांडक्यांसह तिथे आले. त्यांनी शिवीगाळ करत जाधव यांच्याजवळ जाऊन, “आमच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करतोस का? आता तुला मारून टाकतो,” असे धमकावले. त्यानंतर रोशन जाधव याने गावठी पिस्तूल काढून ट्रिगर दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, किशोर जाधव यांनी वेळीच त्याच्या हातावर जोरदार धक्का दिल्याने गोळी हवेत सुटली आणि मोठा अनर्थ टळला.
हल्लेखोर अद्याप फरार, पोलीस तपास सुरू
गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. रविवारी रात्रीपर्यंत कोणताही संशयित ताब्यात आला नव्हता. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.