नाशिकच्या युनिट २ मधील सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र सोपान घुमरे (वय ५६) यांना चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी कारवाई न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना शुक्रवारी (दि. २७) अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना त्यांच्या कार्यालयाबाहेर पंचांसमक्ष पकडले.
तक्रारदार, जो भंगार विक्री व्यवसाय करत होता, याच्या भावावर चोरीच्या नळाच्या वॉल खरेदीप्रकरणी गुन्हा दाखल होता. हा गुन्हा तपासण्याची जबाबदारी घुमरे यांच्याकडे होती. तक्रारदाराच्या भावाला गुन्ह्यातून सोडवण्यासाठी घुमरे यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर रक्कम पाच हजार रुपयांवर निश्चित झाली.
तक्रारदाराने या प्रकाराची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानुसार, शुक्रवारी सापळा रचून उपनिरीक्षक घुमरे यांना पाच हजार रुपये स्वीकारताना पकडण्यात आले.
घुमरे यांच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ व ७ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक मीरा अदमाने करत असून, सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक अतुल चौधरी होते.