हजारो शिवप्रेमींचा जल्लोष, जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात शिवजन्मोत्सव दणक्यात साजरा
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक रोड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त(Chatrapati Shivaji Maharaj Jayanti) नाशिक रोडवर शिवभक्तांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. हजारो शिवप्रेमींनी भगव्या ध्वजांच्या लयलुटीत, जयघोषांच्या गजरात आणि ढोल-ताशांच्या गगनभेदी निनादात शिवजन्मोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला. विशेष आकर्षण ठरले हेलिकॉप्टरमधून झालेली भव्य पुष्पवृष्टी! यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला, तर शिवगर्जनेने आसमंत दणाणून गेला.
Chatrapati Shivaji Maharaj Jayanti “झुलवा पाळणा” कार्यक्रमाने उत्सवाला सुरुवात
शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला शिवजन्मोत्सव समिती नाशिक रोड यांच्या वतीने “झुलवा पाळणा” या भक्तिमय कार्यक्रमाने उत्सवाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या सुरावटीत आणि शिवप्रेमींच्या उत्साही सहभागाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.
Chatrapati Shivaji Maharaj Jayanti मध्यरात्री भव्य आरती आणि घोषणांनी आसमंत दणाणला
मध्यरात्री शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर आणि पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य आरती केली. विशेषतः महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. फटाक्यांची आतषबाजी, भगव्या ध्वजांची लयलूट आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
Chatrapati Shivaji Maharaj Jayanti सकाळच्या अभिषेकाने वातावरण शिवमय
सकाळी ८ वाजता अध्यक्ष योगेश गाडेकर, कार्याध्यक्ष सुनील सोनवणे, सरचिटणीस प्रशांत कळमकर, गोकुळ नागरे, विशाल सातभाई व लवटे यांनी सपत्नीक छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक करून जन्मोत्सव साजरा केला. शंखध्वनी आणि मंत्रघोषात पार पडलेल्या या सोहळ्याने वातावरण शिवमय झाले.
हेलिकॉप्टरद्वारे भव्य पुष्पवृष्टी
दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांवर पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष गाडेकर आणि कार्याध्यक्ष सोनवणे यांनी स्वखर्चातून हा महामानवांना मानवंदनेचा सोहळा संपन्न केला. भर उन्हात हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी होताच परिसरात शिवगर्जना, “हर हर महादेव” आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले.
हजारो शिवभक्तांचा जल्लोष
सकाळपासूनच या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बिटको चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा परिसर शिवभक्तांनी फुलून गेला होता.
सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध सामाजिक संस्था आणि हजारो शिवभक्त मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते. या ऐतिहासिक क्षणांचे शिवभक्तांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. संपूर्ण नाशिक रोड परिसर शिवमय झाल्याचे दृश्य सर्वांना मंत्रमुग्ध करणारे होते.