देवळाली Devalali आठवडे बाजारात चोरट्यांचा थैमान! गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरले. स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण.
Nashik : सोमवारच्या आठवडे बाजारात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत, एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लांबवले. या चोरीची किंमत अंदाजे ६० हजार रुपये होती. आठवड्याच्या बाजारात व्यापारी, शेतकरी आणि नागरिक एकत्र येत असताना, चोरटे आपल्या चालाकीने मंगळसूत्र, पर्समधील रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू चोरी करून पोलिसांना आव्हान देत आहेत.
देवळाली गावातील आठवडे बाजारात शेतमाल, घरगुती वस्तू आणि इतर उपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येतात. बाजारात दुपारनंतर व संध्याकाळी गर्दी खूप वाढते, ज्याचा फायदा चोरटे घेत आहेत.
सोमवारी, सायंकाळी पाच वाजता, देवळाली गावातील रोकडोबावाडी येथील रहिवासी जया अनिल खोले बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी चोरट्याने त्यांच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसूत्र लांबविले आणि फरार झाला. या घटनेनंतर उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठवडे बाजारात पोलिस बंदोबस्त वाढवून, साध्या वेशात पोलिसांची गस्त ठेवण्याची मागणी करत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. बाजारात असलेल्या चोरट्यांच्या विरोधात कठोर कारवाईची आवश्यकता निर्माण झाली आहे.