स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची यशस्वी कारवाई
Dhule News | मुंबई-आग्रा महामार्गावरून पिस्तूल तस्करी करणाऱ्या तिघांना धुळ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या निरीक्षक श्रीराम पवार यांच्या पथकाने गजाआड केले आहे. या तरुणांकडून दोन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. यातील दोघांवर धाराशिव जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.
मध्यप्रदेशातून शस्त्र तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहीम (Dhule News)
मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणावर गावठी बनावटीची शस्त्र तस्करी होत असल्याने विशेष मोहीम राबवण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांना दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक पवार यांनी महामार्गावर संशयित वाहनांची तपासणी तसेच गस्त वाढवण्यासाठी विशेष पथक तयार केले.
तस्करांच्या मुसक्या आवळताना (Dhule News)
आज सकाळी मध्यप्रदेशातून एका कारमध्ये हत्यारांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक पवार यांच्या नेतृत्वाखाली सपोनि श्रीकृष्ण पारधी, असई संजय पाटील, पोहेकॉ पवन गवळी, आरिफ पठाण, सचिन गोमसाळे, देवेंद्र ठाकूर, मयूर पाटील, राजीव गिते यांनी महामार्गावर करडी नजर ठेवली. अखेर मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल मुल्लाजीसमोर एम एच ०४ एचवाय ३२३० क्रमांकाची कार थांबवण्यात आली.
झडतीमध्ये हत्यारांचा साठा जप्त
झडती घेतली असता धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी मारुती नागनाथ माने याच्याकडे एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे, तर नाना अंकुश माने याच्याकडे एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे सापडली. या गाडीचा चालक ज्ञानेश्वर रामलिंग कदम यानेही हत्यार तस्करीस मदत केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिघांनाही अटक करण्यात आली.
गंभीर गुन्ह्यांत संशयितांचा सहभाग
प्राथमिक तपासात मारुती माने आणि नाना माने यांच्या विरोधात यापूर्वीच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती उघड झाली आहे. तसेच ही हत्यारे मोठ्या गुन्ह्यासाठी वापरण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.