नाशिक – मिग आणि सुखोई सारख्या जगप्रसिद्ध लढाऊ विमानांच्या निर्मिती आणि देखभालीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)HAL , नाशिक कारखान्यात आता एअरबस ए 320 प्रकारातील नागरी विमानांची देखभाल-दुरुस्ती (एमआरओ) होणार आहे. यासंदर्भातील करारावर गेल्या वर्षी एचएएल आणि एअरबस यांच्यात स्वाक्षरी झाली होती. या प्रकल्पाचे काम 2025 पासून सुरू होणार असल्याची माहिती आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
एचएएलच्या HAL ओव्हरहॉल विभागात सध्या 24 सुखोई एमकेआय 30 लढाऊ विमानांची पुनर्बांधणी केली जात आहे. याच विभागात एअरबस ए 320 विमानांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल. या नव्या करारामुळे नाशिकच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल, असे एचएएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
विशेष म्हणजे, नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील हे पहिले एमआरओ केंद्र आशिया खंडात उभारले जात आहे. एचएएलने HAL याआधी 1,800 हून अधिक मिग आणि सुखोई लढाऊ विमानांची दुरुस्ती केली आहे. त्यामुळे एअरबसशी झालेला हा करार एचएएलच्या अनुभवाचा गौरव मानला जात आहे.
नाशिक जिल्ह्यात डिफेन्स इनोव्हेशन हब घोषित करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे हबमधील औद्योगिक क्षेत्राला चालना मिळणार आहे. स्थानिक उद्योजकांना नवीन संधी मिळतील आणि नाशिकचे औद्योगिक महत्त्व अधिक वृद्धिंगत होईल.
एअरबसकडून एचएएलला HAL प्रशिक्षण, डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रवेश, आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवले जाणार आहे. यामुळे दुरुस्तीची गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढेल.
या प्रकल्पामुळे नाशिकला नागरी आणि संरक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळेल. भविष्यात एअरबससह इतर विमान कंपन्यांचेही प्रकल्प नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे.