नाशिक: रविवार कारंजा येथील ऐतिहासिक यशवंत मंडई (Yashwant Mandai) इमारत जमीनदोस्त करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. थकबाकीदार गाळेधारकांनी अद्यापही आपली गाळे रिकामी न केल्याने महापालिकेने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या निर्णयाला गाळेधारकांनी न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल देत, यशवंत मंडई (Yashwant Mandai) इमारत धोकादायक असल्याचे नमूद केले. महापालिकेच्या योजनेनुसार इमारत पाडून बहुमजली पार्किंग व व्यापारी संकुल उभारले जाणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या दहा ते बारा गाळेधारकांनी आपली गाळे रिकामी केलेली नाहीत. त्यांच्या नावावर सात कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीची वसुली न झाल्यास संबंधित गाळेधारकांच्या मालमत्तांवर बोजा चढवण्याची कार्यवाही होणार आहे.
यशवंत मंडई (Yashwant Mandai) रिकामी करण्यासाठी होणाऱ्या संभाव्य विरोधाला रोखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. महापालिका उपायुक्त श्रीकांत पवार यांनी सांगितले की, “प्रक्रियेसाठी कायदेशीर अडचणी दूर केल्या असून लवकरच अंमलबजावणी सुरू होईल.”
इमारत पाडताना आजूबाजूच्या वाड्यांना, दुकानदारांना किंवा रस्त्यांना हानी होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. संभाव्य जोखीम टाळण्यासाठी तज्ज्ञ कंपनीकडून ही इमारत पाडण्याचे काम केले जाईल. बांधकाम विभाग लवकरच यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करणार आहे.