मुंबईच्या पवईतील हिरानंदानी रुग्णालयात आज (८ जानेवारी) ह्युमन मेटाप्युमो व्हायरस (HMPV) चे पहिले रुग्ण आढळले आहेत. ६ महिन्यांच्या बाळाला या विषाणूचा संसर्ग झाला असून, त्याची चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. बाळाची स्थिती गंभीर असल्यानं, त्याला १ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जेव्हा त्याच्या खोकल्यामुळे ऑक्सिजन पातळी ८४ टक्क्यांपर्यंत घसरली होती.
रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते, या विषाणूवर सध्याला कोणतेही विशिष्ट उपचार नाहीत. त्यामुळे बाळावर आयसीयूमध्ये ब्रॉन्कोडायलेटर्सच्या लक्षणांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. तथापि, स्थानिक प्रशासनाला याबाबत अद्याप अधिकृत अहवाल प्राप्त झालेला नाही, असे परळ येथील बीएमसी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
चीनमध्ये एचएमपीव्हीचा उद्रेक, भारतात खबरदारी
चीनमध्ये ह्युमन मेटाप्युमो व्हायरसचा मोठा प्रादुर्भाव सुरू आहे, त्यामुळे भारतात याच्या फैलावाला रोखण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या नियमित तपासणीमध्ये काही भारतीय नागरिकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. आरोग्य मंत्रालयाने चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक संयुक्त पाहाणी पथकही स्थापन केले आहे.
एचएमपीव्ही: लक्षणे आणि प्रसार
एचएमपीव्ही हा आरएनए विषाणू असून, २००१ मध्ये डच संशोधकांनी याचा शोध लावला होता. या विषाणूमुळे श्वसनासंबंधी गंभीर आजार होतात. याच्या लक्षणांमध्ये खोकला, ताप, आणि सर्दी यांसारखी चिन्हे दिसून येतात. या विषाणूचा प्रादुर्भाव हिवाळा आणि वसंत ऋतूच्या महिन्यांत अधिक असतो, आणि तो खोकला व शिंकण्याद्वारे पसरतो. सीडीडीच्या माहितीनुसार, एचएमपीव्हीचा संसर्ग तीन ते पाच दिवसांचा असतो.
भारत सरकार आणि स्थानिक प्रशासन ह्युमन मेटाप्युमो व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करत आहेत. याव्यतिरिक्त, जागतिक आरोग्य संघटनेकडून चीनमधील परिस्थितीवर सखोल निगराणी ठेवली जात आहे.