Igatpuri : शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना वेळेत, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने मिळावा यासाठी राज्यात डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS) पद्धतीची सुरूवात करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकतो, कारण या अॅपच्या माध्यमातून पिकांची पीक पाहणी सुलभ आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम होईल.
Igatpuri तहसीलदार अभिजित बारावकर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात ई-पीक पाहणी मोबाइल अॅपचा वापर करून आपल्या पिकांची पाहणी करावी. डिजिटल क्रॉप सर्व्हे अॅपसह राज्यभरातील खरीप, रब्बी व उन्हाळी पिकांची पीक पाहणी केली जाईल. प्रत्येक गावासाठी सहायकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, जे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीसाठी मार्गदर्शन करणार आहेत.
तांत्रिक अडचणी असल्यास, शेतकऱ्यांनी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडून मदत घेण्याचे निर्देश दिले आहेत. या डिजिटल उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा, विमा संरक्षण, आपत्ती अनुदान, बँकेच्या वित्तीय सहाय्य आणि ई-शासकीय योजनांचा सहज फायदा होईल.
सर्व शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीचे प्रशिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले जात आहे, आणि या उपक्रमात सहभागी असलेल्या गावांना १५ जानेवारीपर्यंत पूर्ण झालेल्या ई-पीक पाहणीसाठी प्रशस्तिपत्रक देऊन गौरवले जाईल, अशी माहिती तहसीलदार बारावकर यांनी दिली.