भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) इतिहासात आणखी एक सुवर्णक्षणाची भर पडली आहे. डॉ. व्ही. नारायणन यांची इस्रोचे नवे प्रमुख म्हणून निवड झाली असून, ते १४ जानेवारी रोजी विद्यमान प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. सध्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर (LPSC) चे संचालक म्हणून काम करणाऱ्या डॉ. नारायणन यांची कारकीर्द म्हणजे अंतराळ संशोधन क्षेत्रातील उत्कृष्ठ योगदानाचा मूर्तिमंत आदर्श आहे.
डॉ. नारायणन यांनी चार दशके इस्रोच्या Isros विविध पदांवर काम करून संस्थेला जागतिक दर्जाचे स्थान मिळवून दिले आहे. GSLV Mk III च्या C25 क्रायोजेनिक प्रकल्पाचे नेतृत्व करताना त्यांनी भारताला अंतराळ क्षेत्रात स्वावलंबी बनवले. चांद्रयान-२, चांद्रयान-३ आणि आदित्य अंतराळ मोहिमांसाठी दिलेले त्यांचे योगदान भारतीय अंतराळ संशोधनाच्या यशाचा पाया ठरले आहे.
डॉ. नारायणन यांच्या मार्गदर्शनाखाली १८३ लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम्स विकसित करण्यात आल्या, ज्या इस्रोच्या Isros अनेक यशस्वी मोहिमांसाठी वापरण्यात आल्या. रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शन तंत्रज्ञानातील त्यांची तज्ज्ञता ही इस्रोच्या Isros जागतिक प्रतिष्ठेला बळकटी देणारी आहे.
डॉ. नारायणन यांच्या कर्तृत्वाचा गौरव अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी झाला आहे. आयआयटी खरगपूरने त्यांना रौप्य पदक, तर ॲस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाने सुवर्णपदक देऊन सन्मानित केले. त्यांचा अनुभव आणि दूरदृष्टी इस्रोला नव्या उंचीवर नेईल, यात शंका नाही.
डॉ. एस. सोमनाथ यांच्या नेतृत्वाखाली इस्रोने चांद्रयान-३ च्या यशासह जागतिक स्तरावर आपली छाप सोडली. आता त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर डॉ. नारायणन यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली जाणार आहे.