मालेगाव:पत्र्याच्या घरात छताच्या दांड्याला बांधलेल्या झोक्यावर खेळताना गळफास लागल्याने १४ वर्षीय ईश्वर (उर्फ शुभम) विजय बोरसे याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मालेगावच्या वळवाडे चटाणापाडा येथे रविवारी सायंकाळी ७:३० वाजता घडली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
ईश्वरचे आई-वडील ऊसतोड कामगार असल्याने तो वळवाडे येथे आपल्या आजी-आजोबांकडे राहत होता. रविवारी सायंकाळी झोक्यावर खेळत असताना त्याच्या गळ्याला झोक्याचा फास लागला. त्याची आजी बाहेर प्रचार कार्यकर्त्यांशी बोलून पुन्हा घरात आली असता ईश्वरला फास लागलेला दिसला.
आरडाओरड झाल्यानंतर घराबाहेर उभ्या असलेल्या आजोबांसह प्रचार कार्यकर्त्यांनी धाव घेतली. ईश्वरला तत्काळ मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे बोरसे कुटुंबीय व आजी-आजोबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वडनेर खाकुर्डी पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात आत्महत्येच्या दोन घटना
त्र्यंबकेश्वर:तालुक्यातील काकडदरी हरसूल आणि तळवाडे येथे आत्महत्येच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत.
पहिली घटना:
काकडदरी येथे राहणारे सुरेश नारायण राऊत (४०) यांनी आपल्या राहत्या घरात नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी ही घटना समोर आली. त्यांच्या भावाने त्र्यंबकेश्वर पोलिसांना याची माहिती दिली. या घटनेत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसरी घटना:
तळवाडे येथील अरुण शिवराम कडलग (४२) यांनी घराच्या पडवीत गळफास घेतला. कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून केली आहे.
या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.