कामटवाडे खून प्रकरण: चार तासांत तिघे आरोपी व दोन विधीसंघर्षीत बालकांना अटक

Kamatwade murder case: Three accused and two minors in legal battle arrested in four hours

कामटवाडे परिसरात एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याप्रकरणी दोन विधीसंघर्षीत बालकांसह तिघा आरोपींना गुन्हे शाखा युनिट क्र. १ च्या पथकाने अवघ्या चार तासांत जेरबंद केले. अंबड पोलीस ठाण्यात भादंवि कलम १०३(१), ३(५) अंतर्गत दाखल असलेल्या या गुन्ह्याचा तपास अत्यंत कसोशीने करत आरोपींचा तपास लावण्यात आला.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उप-आयुक्त प्रशांत बच्छाव आणि सहा. पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट १ चे अधिकारी व अंमलदार सतर्कतेने तपास करत असताना पोलीस हवालदार विशाल काठे आणि प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी आसाराम बापू पुलाजवळ थांबले आहेत. सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तत्काळ कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतले.

तपासात आरोपींनी सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर याच्या सांगण्यावरून हा खून केल्याची कबुली दिली. अटक केलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत,मोहन ज्ञानेश्वर वायचळे (१८, सातपूर),राहुल राजु गडदे (२०, आनंदवली), साहिल पिंटु जाधव (२१, माळीवाडा, गंगापूर रोड),
तसेच दोन विधीसंघर्षीत बालकांचा समावेश आहे. तपासानंतर सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उप-आयुक्त प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या पथकात सपोनि हिरामण भोये, पोउनि वेतन श्रीवंत, पोउनि सुदाम सांगळे, पोहवा प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, विशाल काठे आदींचा समावेश होता.