छत्रपती संभाजीनगर, दि. 6 (विमाका) – महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटील हे गावपातळीवरील प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून, शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी व गावातील शांतता राखण्याच्या कामात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. गावपातळीवरील समन्वय राखण्याची जबाबदारी पोलीस पाटील यांच्यावर असल्याने शासनाने त्यांच्या सर्व मागण्यांचा विचार करून संवेदनशील निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राज्यस्तरीय पोलीस पाटील संघटनेचा मेळावा :
महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनच्या (Police Patil Sanghatana) वतीने राज्यस्तरीय आभार मेळावा व सत्कार समारंभाचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी लॉन्स, हर्सूल सावंगी रोड येथे करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यांच्या सोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार रमेश बोरनारे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष महादेव नागरगोजे आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस पाटीलांच्या मानधनात वाढ :
मुख्यमंत्री शिंदे (mukhymantri Eknath Shine) यांनी पोलीस पाटीलांचे महत्त्व ओळखून त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी साडेसहा हजार रुपये मिळणारे मानधन आता 15 हजार रुपयांवर नेण्यात आले आहे. याबाबत पोलीस पाटील संघटनेने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. “पोलीस पाटील हे शासनाचे नाक, कान आणि डोळे आहेत. आपल्याला 24 बाय 7 सतत काम करावे लागते. शासनाने आपल्या या प्रामाणिक कार्याची दखल घेतली आहे,” असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मराठवाड्याच्या विकासासाठी शासनाची बांधिलकी :
मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठवाडा विभागातील विविध योजनांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, शासन कुटुंबातील प्रत्येक घटकाला शिक्षण, आरोग्य, आर्थिक सबलीकरण, शेतकरी कल्याण अशा विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देत आहे. “विकास आणि कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी शासन कटिबद्ध आहे, आणि पोलीस पाटील यांनी गावपातळीवर या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मेळाव्याचे प्रास्ताविक आणि आभार :
मेळाव्याचे प्रास्ताविक पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष महादेव नागरगोजे यांनी केले. त्यांनी पोलीस पाटीलांच्या समस्या व मागण्यांचा सविस्तर आढावा घेतला आणि शासनाने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्याबद्दल आभार मानले. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपले मनोगत व्यक्त केले व पोलीस पाटीलांच्या कार्याचे कौतुक केले.