धनंजय मुंडे नंतर महायुती सरकारमधील आणखी एका मंत्र्याची विकेट पडणार?
Manikrao kokate latest News: राज्यात राजकीय हालचालींना वेग आला असून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao kokate) यांचेही मंत्रिपद धोक्यात आहे. नाशिक सत्र न्यायालय आज त्यांच्या शिक्षेच्या स्थगितीबाबत अंतिम निर्णय देणार आहे.
Manikrao kokate: कोकाटे यांचे आमदारकी आणि मंत्रिपद संकटात
न्यायालयाने जर कोकाटे यांच्या २ वर्षांच्या शिक्षेवर स्थगिती न दिल्यास, त्यांचे आमदारकी आणि मंत्रिपद गमावण्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार २ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षेची शिक्षा ठोठावल्यास संबंधित नेत्याचे सभागृहातील सदस्यत्त्व रद्द होऊ शकते.
राजकीय घडामोडींना वेग – विरोधक आक्रमक
राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, विरोधकांनी सभागृहात धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. यामुळे विधिमंडळात मोठा गदारोळही झाला.
कालच मस्साजोग हत्याकांडप्रकरणी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि राज्यपालांनी तो मंजूर केला. त्यामुळे आता महायुती सरकारमधील दुसऱ्या मंत्र्याची म्हणजे माणिकराव कोकाटे यांचीही विकेट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काय आहे माणिकराव कोकाटे यांच्यावरचा आरोप?
1995 मधील सदनिका गैरव्यवहार प्रकरण
- 1995 मध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाने आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचे दाखवून मुख्यमंत्री स्वेच्छानिधीतील १०% आरक्षित सदनिका बेकायदेशीररित्या मिळविल्या.
- सदनिकांसाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
- मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या गैरव्यवहाराविरोधात याचिका दाखल केली होती.
- सरकारवाडा पोलिस ठाण्यात कोकाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा आणि ५०,००० रुपये दंड
या प्रकरणाचा तब्बल २९ वर्षांनी निकाल लागला असून नाशिक कोर्टाने कोकाटे आणि त्यांच्या भावाला २ वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आज नाशिक न्यायालयाचा निकाल महत्त्वाचा
माणिकराव कोकाटे यांनी शिक्षेवर स्थगिती मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. सुरुवातीला कोर्टाने शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली होती. मात्र, अंतिम निर्णय राखून ठेवण्यात आला होता.
आज नाशिक सत्र न्यायालय शिक्षेच्या स्थगितीबाबत अंतिम निर्णय देणार आहे. जर शिक्षेला स्थगिती मिळाली नाही, तर कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते.
राजकीय वर्तुळात तणाव – पुढे काय होणार?
शरद शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयातही या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता कोर्टाचा अंतिम निकाल काय लागतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.