पाथर्डी निर्मल दरबार आश्रमात कुंडलिनी जागृतीचा दिव्य सोहळा
नाशिक: मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि आनंदाचा अनुभव देणारी ध्यान Meditation साधना आजच्या धकाधकीच्या जीवनात अत्यावश्यक ठरली आहे. याच विचारातून जागतिक ध्यान दिनाच्या निमित्ताने सहज योग परिवाराने नाशिक जिल्ह्यातील १३५ केंद्रांवर भव्य ध्यान साधना सत्रांचे आयोजन केले.
पाथर्डी येथील निर्मल दरबार आश्रमात आयोजित विशेष कार्यक्रमात साधकांनी कुंडलिनी शक्ति जागृतीच्या माध्यमातून निर्विचार ध्यान Meditation समाधीची अनुभूती घेतली. या सायंकाळी ६.३० वाजता सुरू झालेल्या सोहळ्याला साधकांची मोठी उपस्थिती लाभली. कार्यक्रमादरम्यान प. पू. माताजी श्री निर्मला देवी यांच्या सहज योग मार्गदर्शनाचे विचार साधकांपर्यंत पोहोचवण्यात आले.
डॉ. शीतल विसावे, सचिन कापडणीस, डॉ. संजय विसावे आणि जिल्हाप्रमुख मुकुंद सूर्यवंशी यांच्यासह मार्गदर्शकांनी साधकांना ध्यान साधनेचे तांत्रिक व आध्यात्मिक महत्त्व पटवून दिले. “ध्यान साधनेने मनातील भीतीचा नाश होतो, आत्मविश्वास उंचावतो आणि सृजनशीलतेला चालना मिळते. मन स्थिर होऊन तणावमुक्त जीवनाचा मार्ग सुकर होतो,” असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
Meditation : ध्यान साधनेच्या अद्वितीय अनुभूतीसाठी सहज योग परिवाराचे १३५ केंद्रांवर विशेष आयोजन
सहज योग साधनेमुळे साधकांच्या अंतर्मनात सकारात्मक बदल होतात. आत्मशांती, तणावमुक्तता आणि कुशाग्र विचारशक्ती या लाभांमुळे साधकांचे आयुष्य अधिक सुखकर व समाधानकारक होते. याशिवाय, साधनेतून अंतरिक ऊर्जेचा प्रवाह अनुभवता येतो, ज्यामुळे व्यक्तिमत्त्व अधिक परिपक्व आणि दृढ बनते.
आरती व सकारात्मक ऊर्जेचा महापूर
कार्यक्रमाच्या समारोपाला सामूहिक आरती करण्यात आली. साधकांनी या दिव्य अनुभूतीचा मनमुराद आनंद घेतला आणि पुढील जीवनात ध्यान साधनेचा नियमित सराव करण्याचा संकल्प केला.