धुळे – MSEB (MSEDCL) चे CEO असल्याचा बहाणा करून 13 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीला सायबर पोलिसांनी चार महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर गजाआड केले. सुरतमधून अटक करण्यात आलेल्या तिघांमध्ये यशवंत काशिनाथ पाटील, जयशंकर गोपाल गोसाई आणि विजय शिवहरी शिरसाठ यांचा समावेश आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
धुळ्यातील जय श्रीकृष्णा इंटरप्रायजेस या इलेक्ट्रिकल फर्मचे मालक जिजाबराव आनंदराव पाटील यांना विज वितरण कंपनीच्या (MSEDCL) कार्यकारी अभियंत्यांच्या नावाने फोन आला. त्यात, “MSEDCL चे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांना तातडीने संपर्क करा” असे सांगण्यात आले.
थोड्याच वेळात फिर्यादीच्या व्हॉट्सअपवर अनोळखी नंबरवरून कॉल आला. “मी लोकेश चंद्रा बोलतोय. एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये व्यस्त आहे. माझे काका सूरतमधील रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर तातडीने ऑपरेशन करावे लागणार आहे. कृपया 8 लाख रुपये तातडीने पाठवा. संध्याकाळपर्यंत पैसे परत करतो.” अशा थाटात बोलून त्यांनी फिर्यादीला भुलवलं.
विश्वास बसल्यामुळे फिर्यादीने नेट बँकिंगद्वारे RTGS पद्धतीने दिलेल्या खात्यावर 8 लाख रुपये ट्रान्सफर केले. काही वेळाने पुन्हा फोन करून अजून 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. यावेळी दहिसर (मुंबई) येथील एका खात्यावर पैसे पाठवायला सांगण्यात आले. संशय न आल्याने फिर्यादीने 5 लाख रुपयेही पाठवले.
सायंकाळी दिलेल्या नंबरवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, फोन बंद असल्याचे दिसले. त्यानंतर कार्यकारी अभियंता जोशी यांच्या मदतीने खऱ्या लोकेश चंद्रांशी संपर्क साधण्यात आला. मात्र, त्यांनी कोणतीही पैशांची मागणी केली नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
सायबर पोलिसांची प्रभावी कारवाई
धुळे सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या पथकाने सखोल तपास सुरू केला. तब्बल चार महिन्यांच्या प्रयत्नांनंतर, सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपींचा शोध घेत त्यांना सुरत येथून ताब्यात घेण्यात आले.
सायबर गुन्हेगारीबाबत पोलिसांचे आवाहन
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सायबर गुन्हेगार सामान्य नागरिकांना 8 ते 10 हजार रुपयांचे आमिष दाखवून त्यांच्या नावाने बँक खाते उघडतात. त्यानंतर त्या खात्यांचा वापर आर्थिक फसवणुकीसाठी केला जातो. त्यामुळे कोणीही स्वतःच्या नावावर असलेले बँक खाते, ATM कार्ड किंवा सिम कार्ड इतर कोणालाही देऊ नये. अन्यथा तुम्हीही गुन्ह्यात अडकू शकता.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी, जगदीश खैरनार, पोहेकॉ खलाणेकर, राजू मोरे, मराठे आणि पोलीस कॉन्स्टेबल तुषार पोतदार आदींचा समावेश होता.