पुणे: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात विरोधकांनी आरोप केलेले वाल्मिक कराड यांनी आज पुणे सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra fadnavis यांनी माध्यमांशी संवाद साधत कडक कारवाईचे आश्वासन दिले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्येक आरोपीवर कडक कारवाई केली जाईल. कुणालाही अशाप्रकारची हिंसा करण्याचा अधिकार नाही. गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही. सर्व दोषी जोपर्यंत फासावर लटकत नाहीत, तोपर्यंत पोलीस कारवाई सुरूच ठेवतील.”
मुख्यमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले की, “आम्ही तपासाला गती दिली आहे. त्यामुळेच वाल्मिक कराड यांना शरणागती पत्करावी लागली. हत्येतील फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलीसांचे वेगवेगळे पथक कामाला लागले असून कुठलाही आरोपी सुटणार नाही.”
मुख्यमंत्र्यांनी यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी फोनवर संवाद साधल्याचे सांगितले. “त्यांना आश्वस्त केले आहे की, जोपर्यंत सर्व आरोपींना फाशी होत नाही, तोपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू राहील,” असे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले.