मुंबई मेट्रो 3: भूमिगत प्रवासाचे उद्घाटन (PM Narendra Modi Metro)

मुंबई मेट्रो 3: भूमिगत प्रवासाचे उद्घाटन (PM Narendra Modi Metro)

मुंबई, 5 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईच्या पहिल्या पूर्णत: भूमिगत मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. ही मेट्रो लाईन 3 आहे, जी आरे जेव्हीएलआर ते बीकेसी (बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स) या 12.69 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवर आहे. हा मेट्रोचा पहिला टप्पा आहे, ज्यामध्ये 10 स्थानके असतील. त्यापैकी 9 भूमिगत आणि 1 जमीनस्तरीय आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

हा प्रकल्प मुंबईच्या वाहतुकीला मोठी गती देईल आणि प्रकल्पाचा पहिला टप्पा सुमारे ₹14,120 कोटींच्या खर्चाने पूर्ण झाला आहे.उद्घाटन समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.

या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मेट्रो स्टेशनवरून मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून प्रवासाचा शुभारंभ केला. बीकेसी ते सांताक्रूज असा मेट्रो प्रवास करताना मोदींनी प्रवाशांसोबत संवाद साधला, ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांशी विशेष संवाद झाला.

यादरम्यान, मोदींनी ‘मेट्रो कनेक्ट-3’ या मोबाइल अॅपचे लोकार्पण केले, जे प्रवाशांच्या सोयीसाठी तयार करण्यात आले आहे. त्याचबरोबर मेट्रो 3 प्रकल्पाच्या प्रवासावर आधारित ‘कॉफी टेबल बुक’चेही अनावरण करण्यात आले, ज्यामध्ये भूमिगत मेट्रोच्या विविध दृश्यांचे फोटोंचा समावेश आहे.मेट्रो 3 च्या आरे ते बीकेसी या मार्गाचे लोकार्पण झाल्यानंतर या मार्गावरील सेवा 5 ऑक्टोबर 2024 पासून जनतेसाठी सुरू करण्यात येणार आहे.

या मेट्रोचे उद्घाटन झाल्याने मुंबईतील वाहतूक कोंडी दूर होण्याची अपेक्षा आहे, तसेच या प्रकल्पाने मुंबईच्या नागरी विकासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.याशिवाय, मोदींनी मुंबई आणि ठाणे परिसरातील ₹32,800 कोटींच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचे भूमिपूजन केले. यामध्ये विविध विकास योजना समाविष्ट होत्या, ज्यामुळे या क्षेत्राचा आर्थिक आणि सामाजिक विकास गतीमान होईल.

Leave a Reply