नाशिक : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले असून, वारंवार होणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी या विषयाची गंभीर दखल घेतली आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश देत, खड्ड्यांबाबत दररोज अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दररोजचा अहवाल अनिवार्य
आयुक्तांनी स्पष्ट केले की, शहरातील प्रत्येक विभागातील खड्ड्यांची पाहणी करून ते तत्काळ बुजविण्याची कार्यवाही व्हावी. यासाठी अभियंत्यांना दररोजचा अहवाल शहर अभियंत्यांकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
साप्ताहिक बैठकांची योजना
अतिरिक्त आयुक्त (शहर) यांना आठवड्यातून दोन वेळा बांधकाम विभागाची बैठक घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बैठकीत विभागीयj कामांची प्रगती, खड्ड्यांचे बुजविण्याचे प्रमाण, व अपघात रोखण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येणार आहे.
“खड्ड्यांमुळे अपघात व बदनामी” – आयुक्त खत्री
“शहरातील खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असून, यामुळे महानगरपालिकेची प्रतिमा मलिन होत आहे. तक्रारींचे प्रमाणही वाढले आहे, त्यामुळे ही बाब गंभीर असून तत्काळ ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे,” असे आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले.
‘व्हॉट्सअॅप ग्रुपवर माहिती शेअर करा’
प्रत्येक विभागात झालेल्या कामाची माहिती महापालिकेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करण्यात येणार आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंते, उपअभियंते, विभागीय अधिकारी, आणि अतिरिक्त आयुक्त सहभागी असतील.
नाशिककरांची अपेक्षा वाढली
सिडको, सातपूर, नाशिकरोड, पंचवटी, व नाशिक पश्चिम भागांतील खड्ड्यांच्या समस्यांवर महापालिकेने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. खड्डे बुजवण्यासाठी वेळेवर कारवाई झाली, तर नागरीकांना दिलासा मिळेल, असे वाटते.