नाशिकमध्ये मध्यरात्रीचा थरार – चोरट्यांचा बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न उधळला
श्वानाच्या भुंकण्याने रहिवासी जागे, चोरट्यांना पळ काढावा लागला
Nashik Crime : दत्त मंदिर रोडवरील लोकमान्य नगर परिसरातील अनुराग बंगल्यात शनिवारी (दि. १) मध्यरात्री चोरट्यांनी शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंगल्यातील श्वानाच्या सतर्कतेमुळे हा कट उधळला गेला. श्वानाच्या भुंकण्यामुळे रहिवासी जागे झाले आणि त्यांनी चोरट्यांना हुसकावून लावले.
सीसीटीव्हीत कैद झाला चोरट्यांचा डाव (Nashik Crime)
अनुराग बंगल्यात तंद्रा आनंद चॅटर्जी (६३) कुटुंबीयांसह राहतात. बंगल्याच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, ज्यात चोरटे स्पष्टपणे कैद झाले. फुटेजनुसार, एका चोरट्याने कुंपणावरून उडी मारून बंगल्यात प्रवेश केला, तर इतर दोन-तीन चोरटे आत येण्याच्या तयारीत होते.
चंदन चोरट्यांना माघारी फिरावे लागले(Nashik Crime)
चोरट्यांची चाहूल लागताच श्वानाने जोरजोरात भुंकण्यास सुरुवात केली. यामुळे चॅटर्जी कुटुंबीय जागे झाले आणि त्यांनी दाराजवळ चेहरा झाकलेला चोरटा पाहताच मोठ्याने “चोर, चोर!” असा आरडाओरड केला. अचानक गोंधळ उडाल्याने चोरटे आल्या मार्गे पळून गेले. या चोरट्यांचा उद्देश बंगल्यातील चंदन वृक्ष चोरण्याचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली?
या घटनेनंतर नागरिकांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला. अखेर, तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांची पोलिस गस्त वाढवण्याची मागणी
या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली असून नागरिकांनी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे. मागील काही दिवसांपासून नाशिकमध्ये चंदन चोरीच्या घटना वाढल्या असून या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.