नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नदीघाटांची लांबी वाढविण्यासह साधुग्रामच्या विस्तारीकरणासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू आहेत. पर्यावरण विभागाने गोदावरी नदीपात्रात काँक्रिटीकरणाला बंदी घातली असून, गेल्या २० वर्षापासून भूसंपादनाचा प्रश्नही प्रलंबित आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काँक्रिटीकरण व विस्तारीकरणाचा घाट घातला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. २९) सिंहस्थ कुंभमेळाच्या आढाव्यासाठी बैठक झाली. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, एनएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे स्नानाकरिता नदीघाटांची लांबी वाढविण्याचा विचार प्रशासन करत आहे.
२००३ मध्ये घाटांची लांबी दीड किलोमीटर होती. २०१५ मध्ये त्यात वाढ करून सहा किलोमीटरचे घाट बांधण्यात आले. यंदाच्या कुंभमेळ्यात त्यात अधिक वाढ केली जाऊ शकते. मात्र, पर्यावरण विभागाने नदीपात्रात काँक्रिटीकरणावर अगोदरच बंदी घातली आहे. असे असताना प्रशासनाच्या घाट विस्तारीकरणावर प्रशचिन्ह उभे ठाकले आहे. २०१४-१५ च्या कुंभमेळ्यात नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये अनुक्रमे ३२५ व १७ एकरवर साधुग्राम होता. यंदा साधु-महंत व भाविकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने क्षेत्र वाढविण्यात येणार आहे.
नाशिकला ४०० एकरपर्यंत हा विस्तार केला जाणार आहे. पण २० वर्षापासून साधुग्रामच्या भूसंपादनाचा मुद्दा प्रलंबित आहे. केवळ ३५ एकरचे क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. यंदा साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा संपादित करण्याला आमचे प्राधान्य असेल, असे डॉ. गेडाम यांनी सांगितले. कुंभमेळ्याकरिता शिल्लक कालावधी लक्षात घेता भूसंपादन वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे. शहरात काही ठिकाणी उड्डाणपूल आवश्यक असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येईल, असे डॉ. गेडाम यांनी सांगितले.
गर्दीनुसार वाहतूक नियोजन
सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दी व वाहतूक नियंत्रणासाठी शहरात स्मार्टसिटीमार्फत एक हजार ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. त्यावर पोलिस विभागाशी चर्चा करून सीसीटीव्ही बसवावे. सीसीटीव्ही जलदगतीने कार्यरत करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना डॉ. गेडाम यांनी बैठकीत केल्या. प्रत्येक पर्वणीला अंदाजे ८० लाख भाविक येतील. त्यामध्ये ३० लाख भाविक त्र्यंबकला भेट देण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पर्वणीच्या आठ दिवस आधी व नंतर गर्दीचा अंदाज घेत वाहतुकीचे नियोजन केले जाईल, असे डॉ. गेडाम यांनी सांगितले.
या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा
- पायाभूत सुविधांवर भर
- सीसीटीव्हीद्वारे गर्दीचे नियोजन
-गर्दी होताच कॅमेरे देणार सिग्नल
-पर्वणीला टप्प्याटप्प्याने भाविक सोडणार