नाशिक: मराठी भाषेच्या सेवा कार्यात माझी थोडीशी मदत झाली याचा मला आनंद आहे. जमेल तेवढी मदत करायची, हे मी ठरवलेले आहे. त्यातून तुमच्या शाखेला भूखंड मिळून फायदा झाला हे चांगले झाले. आता काही जेष्ठ तज्ज्ञांशी चर्चा करा आणि शासनाकडून मिळालेल्या या जागेत उच्च दर्जाचे कार्य उभे करा,” असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेला दिला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
मसापच्या नाशिकरोड शाखेला राज्य शासनाने नुकताच देवळाली शिवारातील भूखंड मंजूर केला. या मंजुरीसाठी शरद पवार यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी मसापच्या शाखेला नेहमीच प्रोत्साहन दिले होते. शाखेचे कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, कार्यकारणी सदस्य रेखा पाटील, हर्षल भामरे, वृंदा देशमुख यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली.
या भेटीच्या दरम्यान, शरद पवार यांचा विशेष स्मृतिचिन्ह, ग्रंथ भेट आणि मायेची शाल देऊन सत्कार करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या.
शरद पवारांनी भेट दिलेल्या पुस्तकाचे आणि लेखक शिवराज गोर्ले यांचे कौतुक केले. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत असूनही मसापच्या शिष्टमंडळाला वेळ देऊन मराठी भाषेप्रती असलेली आपली संवेदना व्यक्त केली. या कार्यक्रमाचे संयोजन प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांनी केले.