राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत उदय सांगळे यांनी पक्षात प्रवेश केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी पक्षाच्या
वरिष्ठांचा आदेश शिरसावंद्य मानून काम करणार असल्याची प्रतिक्रिया दिले. महाविकास आघाडीत समावेश असलेल्या उबाठा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मोट बांधून उदय सांगळे यांना आघाडीची विस्कटलेली घडी बसवावी लागणार आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
गेल्या चार-पाच दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेशासाठी मुंबईत ठाण मांडून बसलेले उदय सांगळे यांचा वाय. बी. चव्हाण सेंटरला पक्षात अधिकृत प्रवेश झाला. त्यामुळे महाविकास आघाडीचे ते अधिकृत उमेदवार असतील. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांना एबी फॉर्म देण्यात आल्यामुळे त्यांची उमेदवारी अधिकृत झाली. त्यामुळे सिन्नरला आता आमदार माणिकराव कोकाटे विरुद्ध सांगळे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट असा चुरशीचा सामना रंगणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आघाडीची उमेदवारी मिळवण्यासाठी कोंडाजी मामा आव्हाड, प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, तालुकाध्यक्ष संजय सोनवणे इच्छुक होते. गेल्या चार- पाच दिवसांपासून जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड तिकीट मिळण्यासाठी मुंबईत ठाण मांडून होते. मात्र, पक्षाने निष्ठावंताऐवजी आयात उमेदवाराला संधी दिल्याने निष्ठावंतांना तलवारी ‘म्यान’ कराव्या लागल्या, त्यामुळे या निवडणुकीत ते वरिष्ठांचा आदेश पाळून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम करणार की, इच्छेविरुद्ध उमेदवारी दिल्यामुळे वेगळा मार्ग चोखाळणार, हे येणारा काळच सांगणार आहे.
सिन्नरमध्ये सांगळे-कोकाटे आमनेसामने; वाजेंची भूमिका निर्णाय
गेल्या १५ वर्षांपासून राजाभाऊ वाजे आणि उदय सांगळे हे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात एकत्रित राजकीय लढा देत होते. मात्र, ऐन लोकसभेच्या तोंडावर मतभेद झाल्याने उदय सांगळे यांनी राजाभाऊ वाजेंना सोडचिड्डी देत वेगळी वाट धरली . त्यामुळे महाविकास आघाडीने सांगळेंना उमेदवारी देऊ नये, असा सूर वाजे गटातून निघत होता. मात्र, त्याउपरही उमेदवारी मिळवण्यात सांगळे यशस्वी झाले. शिवाय प्रवेशानंतर लागलीच सांगळे यांच्या बॅनरवर सोशल मीडियावर राजाभाऊ वाजे यांचे फोटोही झळकले. त्यामुळे या निवडणुकीत वाजे सांगळे एकाच व्यासपीठावर येणार का, आलेच तर आघाडीच्या प्रचारात वाजे सक्रिय सहभागी होणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.