Nashik : गंजमाळ सिग्नलजवळील मोकळ्या जागेत उभा असलेला भला मोठा भेंडीचा वृक्ष रविवारी सकाळी नऊच्या सुमारास अचानकपणे उन्मळून पडला. या घटनेत झाडाखाली उभ्या असलेल्या चार वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Nashik : नाशिकमध्ये भेंडीचा वृक्ष उन्मळून पडला; चार वाहनांचे नुकसान, जीवितहानी टळली
झाडाच्या छायेत उभ्या असलेल्या मोहम्मद गुलाम कोकणी यांची कार (एम.एच०२ बीझेड ५०९०), अक्षय भावलीकर यांची रिक्षा (एम.एच१५ एफयु ५४४२), रफिक शेख यांची रिक्षा (एम.एच१५ एफयु ४८३९), आणि एक दुचाकी (एम.एच०२ डी८६१८) यांचे मोठे नुकसान झाले.
Nashik : चार वाहनांचे नुकसान, जीवितहानी टळली
घटनेची माहिती मिळताच शिंगाडा तलाव येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयातून लिडिंग फायरमन विजय शिंदे, बंबचालक गणेश गायधनी, फायरमन विभू कावरे, यश सोनवणे, व यश व्यवहारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पेट्रोल कटर व कुन्हाडीच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या कापून दाबली गेलेली वाहने मोकळी केली.
घटनेच्या वेळी सकाळ असल्याने झाडाखाली मानवी वर्दळ नव्हती. अन्यथा, परिसरातील मुले व नागरिक झाडाखाली सावलीसाठी बसलेले असते, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
पावसाळ्यात या झाडाच्या फांद्या पडल्याच्या घटना यापूर्वी घडल्या होत्या, मात्र झाड कोसळण्याचा धोका लक्षात घेतला गेला नव्हता. झाडाच्या बुंध्याची स्थिती खराब झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहे.