जिल्हा परिषदेच्या गट आणि गण रचनेत बदल होणार?
Nashik Zilla Parishad Reorganization : 2011 च्या जनगणनेनंतर जिल्हा परिषदेच्या गट आणि गण रचनेत बदल झाला असल्यास, त्यासंबंधीची अद्ययावत माहिती विहित नमुन्यात भरून पाठवण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने जिल्हाधिकार्यांना दिले आहेत.
ग्रामविकास विभागाचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
गेल्या २५ फेब्रुवारी रोजी पाठवलेल्या पत्रात जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण लोकसंख्येतील बदल, नवीन ग्रामपंचायतींची स्थापना, तसेच गावांची पुनर्रचना याबाबत सविस्तर माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या काही वर्षांत मोठे बदल – प्रशासनाचा अहवाल महत्त्वाचा
गेल्या पाच ते आठ वर्षांत शहरी भागातून ग्रामीण भागात आणि ग्रामीण भागातून शहरी भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्याचे दिसून येत आहे. तसेच, नवीन ग्रामपंचायती निर्माण होणे, काही भागांचे इतर तालुक्यात समावेश होणे, किंवा नव्या महानगरपालिका आणि नगरपरिषदांची निर्मिती होणे यामुळे लोकसंख्येची रचना बदलली आहे.
संकलित करण्यात येणारी माहिती:
✔ तालुका आणि पंचायत समितीचे नाव
✔ एकूण लोकसंख्या, अनुसूचित जाती व जमातींची लोकसंख्या
✔ गाव, वाड्या-वस्त्या, अनुसूचित क्षेत्र म्हणून घोषित भाग
✔ 2011 नंतर अस्तित्वात आलेल्या महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींची माहिती
ग्रामीण विकास धोरणाच्या पुनरावलोकनासाठी महत्त्वाची पायरी
या सर्व संकलित माहितीनुसार, ग्रामविकास विभागाला जिल्हा परिषद गट आणि गण पुनर्रचनेचा अहवाल तयार करता येणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीही हे निर्णय महत्त्वाचे ठरणार आहेत.