सप्तश्रृंगीगड – उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता आणि साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवास ३ ऑक्टोबर सुरुवात होते आहे. या नवरात्र काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टतर्फे हे सोहळे साजरे केले जाणार आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नवरात्रोत्सव ३ ऑक्टोबरपासून सुरु होऊन विजयादशमी १२ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर १६ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर दरम्यान कोजागिरी पौर्णिमा उत्सव साजरा होईल. या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा आणि सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने भाविकांसाठी विविध सेवा आयोजित केल्या जाणार आहेत.
नवरात्राच्या पहिल्या दिवशी, ३ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता श्री भगवतीची पंचामृत महापूजा करण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजता घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ झाला. दररोज सकाळी ७ वाजता पंचामृत महापूजा होणार आहे.
विशेष दिवस म्हणून १२ ऑक्टोबरला विजयादशमीला शतचंडी याग व पूर्णाहुतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर गडावर दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल.
कोजागिरी पौर्णिमा उत्सवाच्या दिवशी, १६ ऑक्टोबरला रात्री १२ वाजता गवळी पाटील कुटुंबीयांच्या हस्ते कीर्तीध्वजाचे ध्वजारोहण होईल. या निमित्ताने कावड यात्रेचाही उत्साह दिसून येईल.
वाहतूक व्यवस्थेत बदल
नवरात्रोत्सवात लाखो भाविक येण्याची अपेक्षा असल्याने ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत सप्तशृंगीगडावर खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. भाविकांच्या सोयीसाठी एसटी बससेवेची व्यवस्था करण्यात आली असून, दर्शनासाठी पायी जाणाऱ्यांसाठी दर्शन रांगा लावण्यात आल्या आहेत.