नाशिक: लग्नानंतर अपत्यप्राप्ती होत नसल्याच्या नैराश्यातून धुळ्याच्या एका महिलेने धक्कादायक कृत्य केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. एमबीए झालेल्या सपना मराठे (वय ३३) हिने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून एका नवजात गोंडस बाळाला पळवून नेले. मात्र, नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या १२ तासांत बाळाची सुखरूप सुटका करत संशयित महिलेला अटक केली.
गर्भवती असल्याचा बनाव करून आखला कट
सपना मराठे हिने सासरी स्वतः गर्भवती असल्याचा खोटा दावा करून माहेरी जाण्याचा बहाणा केला. नाशिक जिल्हा रुग्णालयात तीन दिवस ती प्रसूती कक्षात वावरत होती. दोन बाळंतिणींमध्ये तिने लक्ष केंद्रित करत खान दाम्पत्यालाच लक्ष्य केले, कारण सुमन खान ही महिला एकटी होती आणि तिला फारसे नातेवाईक भेटायला येत नव्हते. मदतीच्या बहाण्याने जवळीक साधून शनिवारी योग्य संधी साधत बाळासह ती पळून गेली.
गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
महिलेचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेने रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका हॉटेलजवळील कॅमेऱ्यात ती रिक्षामध्ये जाताना दिसली. रिक्षाचालकाच्या मदतीने ती निमाणी स्थानकात गेल्याचा सुगावा लागला. दरम्यान, व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून पंचवटीतील एका नागरिकाने पोलिसांना संपर्क साधला.
दिंडोरीत मिळाली संशयित महिला
पोलिसांनी दिंडोरीतील ग्रीनसिटी परिसरातून सपना मराठे हिला अटक केली. बाळाला सुखरूप वाचवून सुमन खान यांच्या कुशीत परत केले. बाळ मिळाल्याने आनंदाने भरलेल्या आईने डोळ्यांतून आनंदाश्रू ढाळले.
मातेचा बीपी होता दोनशेवर
बाळ हरवल्यामुळे सुमन खान यांची प्रकृती बिघडली होती. मात्र, बाळ मिळाल्यानंतर तिची प्रकृती स्थिर झाली.
गायीचे दूध पाजून तिने निभावला बाळाचा सांभाळ संशयित महिलेने बाळाला पंचवटीत एका ओळखीच्या घरी नेऊन गायीचे दूध पाजले. त्यानंतर दिंडोरीतील भावाच्या मदतीने ती घरी गेली. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिचा कट फसला.