सांगलीत एमडी ड्रग्जचा (MD Drugs)मोठा साठा जप्त! मुंबई-पुण्यासह देशभर तस्करीचे नेटवर्क उघड. पोलिसांनी 700 कोटींचा एमडी ड्रग्ज (MD Drugs)हस्तगत केला.
सांगली | प्रतिनिधी
मुंबई-पुण्यासह देशभरात ड्रग्ज पुरवठ्याचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून सांगलीचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. गेल्या वर्षभरात तब्बल पावणे सातशे कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज (MD Drugs) जप्त झाल्यानंतर, पोलिसांनी आणखी एका मोठ्या कारखान्यावर छापा टाकून २९ कोटींचा साठा हस्तगत केला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
गुप्त कारखान्यांचा सुळसुळाट
कार्वे (ता. खानापूर) येथील औद्योगिक वसाहतीत परफ्यूम उद्योगाच्या नावाखाली चालवला जाणारा हा कारखाना तब्बल दोन महिन्यांपासून गुप्तपणे कार्यरत होता. विशेष म्हणजे, या परिसरात कोणताही मोठा उद्योग नाही, तरीही शेजारच्या कारखान्यांनाही या कारखान्याबद्दल कुठलीही माहिती नव्हती. परप्रांतीय मजूर येथे धोकादायक पद्धतीने ड्रग्जचे उत्पादन करत होते.
महावितरणच्या उपकेंद्रातून वीज जोडणी
गुप्त कारखान्याने महावितरणच्या उपकेंद्रातून वीज जोडली होती. शेजारी कोणताही गडबड-गोंधळ न होण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने उत्पादन सुरू ठेवण्यात आले होते. छाप्यादरम्यान, कामगार मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. यावरून उत्पादन करताना हे रसायन किती धोकादायक आहे, हे स्पष्ट होते.
‘म्याव-म्याव’ नावाने विक्री
एमडी ड्रग्जचा गोरखधंदा बॉलिवूड पार्ट्यांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत पोहोचला आहे. ‘म्याव-म्याव’, ‘कॅट’, ‘चॉकलेट’, ‘चावल’ अशा गुप्त नावाने हे ड्रग्ज विकले जात आहे. एका ग्रॅमची किंमत ३ ते ४ हजार रुपये असल्याने तस्करीत मोठा पैसा खेळतो.
तरुण तस्करीच्या जाळ्यात अडकले
या रॅकेटमध्ये अनेक तरुण सामील असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत बलगवडेचा प्रवीण शिंदे, वासुदेव जाधव, प्रकाश मोहिते, विकास मलमे, अविनाश माळी, मांजर्डेचा प्रसाद मोहिते, कुपवाडचा आयुब मकानदार, अक्षय तावडे, रमजान मुजावर, सांगलीचा अथर्व सरवदे आणि संतोष पुकळे यांच्यासह अनेकांना अटक केली आहे.
सांगली ‘ड्रग्ज हब’ बनण्याच्या मार्गावर?
कोल्हापूर, मुंबई, पुणे, सांगली या शहरांमध्ये गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी स्थानिक पातळीवर छापे वाढवले असले, तरीही तस्करीचे नेटवर्क अधिक व्यापक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सांगली जिल्ह्यात वाढणारी ड्रग्जची तस्करी हा गंभीर विषय असून, पोलिसांना या टोळ्यांच्या मुळापर्यंत जाऊन हा धंदा संपवण्याचे मोठे आव्हान उभे आहे.