नाशिक : सातपूर-अंबड लिंकरोड परिसरातील कुशन्स आणि प्लास्टिक रोल बनविणाऱ्या एका गुदामात (Warehouse Fire) बुधवारी पहाटे पाच वाजता भीषण आग लागली. या दुर्घटनेत गुदामासह शेजारील पत्र्याची घरे जळून खाक झाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शकील खान, सलीम शेख आणि सवाल सिंग या तिघांच्या मालकीच्या गुदामात कुशन्स बनविण्याचे काम सुरू असताना अचानक आग लागली. गुदामातील (Warehouse Fire) कामगारांनी आरडाओरड करत बाहेर धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, आगीत मोहम्मद शेख (२५) आणि सोनू शेख (१९) हे किरकोळ जखमी झाले.
गुदामात प्लास्टिक फोम, कापूस, रबर, लाकूड, प्लॅस्टिकचे ड्रम यांसारख्या ज्वलनशील साहित्यामुळे आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. शेजारील चार पत्र्यांच्या घरांनाही आगीने कवेत घेतले.
घटनेची माहिती मिळताच सिडको आणि सातपूर अग्निशमन केंद्रातील जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तीन बंबांच्या सहाय्याने दीड ते दोन तासांत आग पूर्णपणे विझवण्यात यश आले.
सिडको केंद्रप्रमुख प्रमोद लहामगे, सातपूर केंद्रप्रमुख सोमेश पगार आणि त्यांच्या चमूने आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न केले. सुदैवाने, घरे कुलूपबंद असल्याने मोठा अनर्थ टळला.
या दुर्घटनेत दोन घरे आणि गुदाम पूर्णतः जळून खाक झाले आहेत. व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
पोलिस तपास सुरू
आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.