नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील दलालांचा विळखा, सहा वाजेनंतर सुरू होणारे कामकाज आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी भर सभेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यांनी अधिकाऱ्यांना तंबी देत, “अशा प्रकारांना प्रोत्साहन दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असा इशारा दिला.
सभा आणि चर्चेतील ठळक मुद्दे:
मुंबई नाका येथील स्काऊट गाइडच्या कार्यालयात आयोजित या सभेला खासदार भास्कर भगरे यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाचे अधिकारी प्रवीण पाटील, गणेश फुलसुंदर, प्रकाश अहिरे, सुधीर पगार, राजेश बुवा आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सभेत पुढील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली:
दलालांचे नेटवर्क: निवृत्त शिक्षकांच्या साखळीने कार्यालयाच्या कामकाजात व्यत्यय आणत असल्याचा आरोप करण्यात आला.
वयाचा विचार नाही: वृद्ध शिक्षकांना योग्य प्रतिसाद न मिळाल्याची तक्रार करण्यात आली.
अनियमित कामकाज: कार्यालयातील कार्यप्रणाली सायंकाळी ६ वाजेनंतरच सुरू होत असल्याचा आरोप.
आरटीआयची अडचण: माहितीचा अधिकार अंतर्गत माहिती देण्यात टाळाटाळ केली जाते.
अनुकंपा योजना आणि प्रलंबित प्रस्ताव: अनुकंपा योजनेसह टप्पा अनुदान प्रस्ताव मंजुरीत होणारा विलंब.
खासदार आणि आमदारांची तंबी:
आ. सत्यजीत तांबे Satyajeet Tambe आणि खा. भास्कर भगरे यांनी अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार थांबवण्याचे आदेश देत स्पष्ट केले की, “शिक्षण क्षेत्राशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना खपवून घेतले जाणार नाही.”
पुढील पाऊल:
आयुक्त समितीच्या माध्यमातून शिक्षण विभागातील प्रकरणे मार्गी लावण्याची शिफारस करण्यात आली. वेतन आणि संचमान्यता शिबिरांच्या नियोजनावर देखील काटेकोर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले.
शिक्षण विभागातील कार्यप्रणाली सुधारणे ही काळाची गरज असून, हे प्रकरण गंभीरतेने घेतले जाणार असल्याचे तांबे यांनी नमूद केले.