उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार संविधान मंदिराचे उद्घाटन : आयटीआयमध्ये तयारी : संविधानाबाबत लाखो प्रशिक्षणार्थ्यांमध्ये जागरूकता

Uprashtrapati yancha haste hona sanvidhan mandirache udghatan

नाशिक: महाराष्ट्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) प्रशिक्षणार्थ्यांना कुशल बनविण्यासोबतच ते आदर्श नागरिक होण्यासाठी त्यांच्यात संविधानाबद्दल आदर व जागरूकता व्हावी, म्हणून येत्या रविवारी (ता. १५) जागतिक लोकशाही दिनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते संविधान मंदिराचे उद्घाटन होणार आहे. मुख्य समारंभ मुंबईत एलफिस्टन तांत्रिक विद्यालय, मुंबई येथे होणार आहे. राज्यातील सर्व 400 आयटीआय मध्ये आभासी पद्धतीने संविधान मंदिराचे उद्घाटन होईल, अशी माहिती सहसंचालक रवींद्र मुंडासे यांनी दिली.याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशिक्षणार्थीमध्ये देशभक्तीची निर्मिती होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्व शासकीय आणि अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान मंदिर बनविण्यात आले असुन, त्याचे उद्घाटन उपराष्ट्रपती धनखड यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, संचालक सतीश सूर्यवंशी हे उपस्थित राहणार असून, आयटीआयमध्ये संविधान मंदिर निर्मितीची संकल्पना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांची आहे. आयटीआय नाशिक येथील कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम, रोहयो व फलोत्पादन मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, आ. सीमाताई महेश हिरे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, प्रशिक्षणार्थी उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी शहरातील ज्येष्ठ विधीज्ज्ञ विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. दिनांक १२ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये निबंध, वक्तृत्व, रांगोळी, नाट्य, चलतचित्र निर्मिती, वादविवाद स्पर्धांचे आयोजन करून भारतीय संविधानाबाबत प्रशिक्षणार्थ्यांमध्ये जागृती करण्यात येत आहे. सातपूर आयटीआयमध्ये संविधान सप्ताह राबविण्याचे नियोजन उपप्राचार्य मोहन तेलंगी यांच्यासह गटनिदेशक आणि कर्मचारी वृंद करीत आहेत.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Leave a Reply