Shrimad Mahavakya : “जीवन हे केवळ जगण्यासाठी नसून, ते आध्यात्मिक उन्नतीसाठी आहे. आपल्या विचारांची शुद्धता आणि आचरणातील नम्रता यामुळेच खऱ्या भक्तीचा अनुभव मिळतो,” असे मार्मिक विचार प्रसिद्ध कृष्ण कथाकार परमपूज्य महंत मानसशास्त्री यांनी व्यक्त केले. त्यांच्या सुमधुर व ज्ञानसंपन्न प्रवचनाने कोटमगाव कन्हैया नगरी (नाशिक रोड) येथे सुरू असलेल्या श्रीमद महावाक्य निर्वचन निरोपण सोहळ्याला भक्तिमय रंग चढवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रवचन मालिकेला भाविकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. श्रीकृष्णाच्या लीलांचे रसास्वादन आणि भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान यांचा अद्वितीय संगम अनुभवण्यासाठी दूरदूरहून भक्तगण येथे उपस्थित होत आहेत.
महंत मानसशास्त्री यांनी आपल्या प्रवचनात महानुभाव संप्रदायाचा गाभा उलगडला. “महानुभाव संप्रदाय हा कोणत्याही एका धर्माच्या चौकटीत अडकलेला नाही, तर तो सत्याचा शोध घेणारा आहे,” असे सांगत त्यांनी भगवद्गीता आणि उपनिषद यांचा जीवनातील उपयोग स्पष्ट केला.
त्यांनी पुढे दंडवत प्रणाम या संकल्पनेचे स्पष्टीकरण देताना सांगितले, “दंडवत प्रणाम हा केवळ संप्रदायापुरता मर्यादित नाही, तर तो एक जीवनशैली आहे. तो अहंकाराचा त्याग आणि विनम्रतेची जाणीव निर्माण करणारा आहे.” प्रत्येकाने हा भाव जोपासावा, असे आवाहन त्यांनी केले.
“व्यक्तीच्या विचारसरणीचा तिच्या जीवनावर खोल परिणाम होत असतो. 30 सेकंदांमध्ये व्यक्ती रडू शकते, हसू शकते किंवा गंभीर विचार करू शकते. त्यामुळे योग्य विचारसरणी ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा मानसिक संतुलन बिघडू शकते,” असे महंत मानसशास्त्री यांनी सांगितले.
“चंदनाच्या झाडाला त्याच्या सुगंधाची जाहिरात करण्याची गरज नसते, तशीच चांगली संस्कृती स्वतःच्या आचरणातून दिसून येते.” गावाचा विकास हा बाहेरून होत नसून, तो व्यक्तिगत सुधारणा आणि संस्कारातून घडतो, हे त्यांनी स्पष्ट केले.
“व्यक्ती कशी आहे, हे तिच्या शब्दांवरून कळते. चांगले विचार, नम्रता आणि संस्कार हाच खरा वारसा आहे,” असे सांगत त्यांनी सुसंस्कारित समाज घडवण्याचा संदेश दिला.
या प्रवचनाला गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी उपस्थित भक्तगणांनी भगवद्गीतेतील शिकवणी आचरणात आणण्याचा संकल्प केला.
हा सोहळा प्रकाश घुगे व त्यांच्या परिवाराने आयोजित केला असून, तो संपूर्ण महिनाभर कोटमगाव कन्हैया नगरी येथे सुरू राहणार आहे. यामध्ये प्रवचन, कृष्ण कथा आणि भजनसंध्या यांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.