नाशिक रोड, प्रतिनिधी : शालार्थ वेबसाईट बंद पडल्याने पगारपत्रकासह थकीत देय बिलांची कामे खोळंबली आहेत. ऑनलाईन देयकांसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
महाराष्ट्र शासनाची शालार्थ वेबसाईट तांत्रिक कारणांमुळे सातत्याने बंद पडत आहे. शासनाने शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांची ऑनलाईन थकीत देयके सादर करण्याची अंतिम मुदत २० सप्टेंबर पर्यंत देण्यात आली आहे. मागील आठवड्यात सलग तीन दिवस सुटटी असूनही संबधित सेवकांनी शाळा, महाविद्यालयात हजेरी लावली. पण शालार्थची वेबसाईड बंदच होती. या आठवडयात परिस्थिती पुन्हा जैसे थे आहे. यामुळे थकीत देय बिलांची ऑनलाईन कामे खोळंबल्याचे दिसून येत आहे.
शासनाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या माध्यमिक विभागाने १२ सप्टेंबरला अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक, मनपा व सैनिकी शाळा, अध्यापन विद्यालये, सराव पाठशाळा, जिल्हा नाशिक मुख्यध्यापक व प्राचार्य यांच्या नावाने एक परित्रक काढले. परिपत्रकात थकीत पुरवणी बिल देयके १८ सप्टेंबरपर्यंत शालार्थ प्रणालीवर ऑनलाईन सादर करणे आवश्यक असल्याचा म्हटले होते. त्यामुळे संबधित सेवकांनी रविवार व रमजान ईदची सुटटी असूनही कार्यालयात हजेरी लावली. शालार्थची ऑनलाईन वेबसाईट बंद पडल्याने थकीत देयकांची ऑनलाईन कामे खोळंबली. एकीकडे १८ सप्टेंबरची शेवटची मुदत तर दूसरीकडे बंद पडलेली शालार्थ वेबसाईट यामुळे ठराविक मुदतीत कामे होतील की नाही, असा प्रश्न देयकांची कामे करणारे सेवक आणि थकीत देयके धारक असणा-या शिक्षक आणि शिक्षकेत्तर सेवकांपुढे निर्माण झाला होता. अखेर शासनाने २० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली. परंतु, वेबसाईटची समस्या जैसे थे असल्याने थकीत ऑनलाईन दैनिके पुढे पाठवविता आली नाही. संबंधित विभागाने वेबसाईट सुरळीत करून थकीत देयकांसाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली जाते आहे.
रविवार, सोमवार आणि मंगळवार अशी सलग तीन दिवस शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी होती. तरीही कार्यालयात हजर राहून ऑनलाईन देयकाची कामे संबधित सेवकांकडून केली जात होती. वेवसाईटच बंद पडल्याने कामे कशी करणार असा प्रश्न या सेवकांपुढे निर्माण होत आहे. शासनाने शालार्थ वेबसाईट तातडीने सुरू करावी. थकीत वेतन देयके सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यावी.
डॉ. एस. के. शिंदे, अध्यक्ष, राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन संघ