आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (PMRDA) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पुणे महानगर क्षेत्राच्या विकासाच्या दिशा ठरवण्यात आल्या आणि 3,838.61 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांनी विकास प्रक्रियेत पुण्याची सांस्कृतिक ओळख कायम ठेवण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पुणे शहर दाटीवाटीचे होत आहे आणि त्यामुळे नवीन विकसित होणाऱ्या भागात मोकळ्या जागा ठेवण्याची गरज आहे. यासाठी विकास नियोजन करताना तज्ज्ञांची मदत घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यांनी कव्हरशन सेंटरचे जागतिक दर्जाचे नियोजन करण्याची सूचना केली, तसेच गुंठेवारी अधिनियमातील शुल्क कमी करण्याबाबतही विचार मांडला.
यावेळी पीएमआरडीएद्वारे बांधण्यात येणाऱ्या परवडणाऱ्या घरांच्या गुणवत्तेबाबत काटेकोरपणे लक्ष ठेवण्याचे आदेश दिले गेले. 4,886 घरांपैकी उरलेल्या 1,620 घरांची लवकरच सोडत काढली जाईल आणि दुसऱ्या टप्प्यातील 6,000 घरांच्या बांधकामास वेग दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत पुणे महानगर प्रदेशासाठी ठाणे शहराच्या धर्तीवर आपत्ती प्रतिसाद पथक स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच 10 ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्र आणि 11 ठिकाणी मलनिस्सारण योजना तयार करण्याचे प्रस्ताव देखील मंजूर झाले.