नाशिक रोड: रेल्वे मालधक्का रोडवरील अवजड वाहनांना प्रतिबंध करावा या मागणीसाठी २३ सप्टेंबरपासून सुरू असलेले बेमुदत साखळी उपोषण आज चौथ्या दिवशी स्थगित करण्यात आले. स्थानिक रहिवासी आणि भारतरत्न फाऊंडेशनचे संस्थापक रविंद्र जाधव यांनी मालधक्का गेटसमोर उपोषण सुरू केले होते.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
मालधक्का रोड हा दाट लोकवस्तीचा भाग असल्यामुळे, या भागात अवजड लोखंडी पोल वाहतूक करणाऱ्या २० ते २५ चाकांच्या वाहनांची सतत ये-जा सुरू आहे, ज्यामुळे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना जीवित धोका निर्माण झाला आहे. परिसरात गौतम छात्रालय, तक्षशिला विद्यालय, अग्लो उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची रोजची ये-जा या धोकादायक रस्त्यावरून होते. याशिवाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमांवेळी आणि आठवडे बाजाराच्या दिवशी मोठी गर्दी होते.
स्थानिक नागरिकांनी वारंवार निवेदन दिले असूनही, आरटीओ, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, रेल्वे प्रशासन आणि महापालिका यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उपोषणाच्या चौथ्या दिवशी, रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांना भेट देऊन, अवजड वाहतुकीबाबत पंधरा दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यामुळे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, युवक अध्यक्ष अमोल पगारे, गुलूशेठ आनंद, भारत निकम, आकाश भालेराव, महिला जिल्हाध्यक्ष मनाली जाधव ,प्रेरणा जाधव, माया चंद्रमोरे, सचिन गांगुर्डे, रंजीत पठारे , विकी चंद्रमोरे, किरण गाडे ,बाळा कदम, गणेश गाडे, सोनू चव्हाण ,महेश चंद्रमोरे , चिंतामण कोरडे, संदिप वाघचौरे, धीरज शिरसाट, चेतन चंद्रमोरे, विजय अहिरे, अजय चंद्रमोरे, सम्राट गायकवाड , बडे पठाण, प्रदीप धोंगडे, आदींसह परिसरातील नागरिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते…