दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नागपूर, 29 सप्टेंबर: नागपूरच्या मिहान प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या वैभवाचा पाया शिवणगाव येथील अनेक कुटुंबांनी घालून दिला आहे. त्यांच्या जमीनींवर उभ्या राहिलेल्या या प्रकल्पामुळे नागपूरला सर्वोत्तम विमानतळाचे स्थान मिळत आहे. मात्र, या प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या शिवणगाव येथील प्रकल्पग्रस्त कुटुंबांना न्याय मिळावा, त्यांच्या जमीनीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी आम्ही प्रारंभापासून आग्रही होतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवणगाव येथे आयोजित भूखंड वितरण समारंभात केले.
समाजभवनात आयोजित या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पग्रस्तांना भूखंडांचे वितरण केले. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात व्यवस्थापकीय संचालिका स्वाती पांडेय, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, तसेच इतर स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “शिवणगावातील रहिवाशांना न्याय देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील होतो. विरोधी पक्षनेता म्हणून या मुद्द्यावर लढा दिला होता. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांना कमी जागा दाखविल्या जात होत्या. तसेच, रेडीरेकनरच्या दरात मोठी घट करून तत्कालीन शासनाने अन्याय केला होता.”
“मुख्यमंत्री झाल्यानंतर, या अन्यायाला दूर करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांना प्राधान्य दिले आणि आज शिवणगावातील कुटुंबांना त्यांच्या हक्काचे भूखंड वितरित करण्यात येत आहेत. यामुळे दिलेला शब्द पाळता आला याचे समाधान आहे,” असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
शिवणगाव मधील भूखंड वितरणासंदर्भात फडणवीस यांनी सांगितले की, “कोणत्याही प्रकल्पासाठी रेडीरेकनरचे दर कमी करून जागा घेणे हे कायद्याच्या विरोधात आहे. यासाठी आम्हाला न्यायालयीन लढा द्यावा लागला. या लढाईत आम्हाला यश मिळाले आणि त्यामुळेच शिवणगावातील अनेकांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळू शकला. आज कोट्यवधी रुपयांच्या घरात असलेल्या मोबदल्यामुळे आणि उच्च किमतीच्या प्लॉट्समुळे प्रभावित कुटुंबांना समाधान मिळाले आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी महसूल विभागाशी संबंधित कामे वेगाने पूर्ण केल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. या लढ्यात स्थानिक प्रशासनाने दिलेली साथ महत्त्वपूर्ण ठरली.
शिवणगावातील प्रकल्पग्रस्तांनी न्यायाच्या प्रतीक्षेत संयम आणि धीराने आपली लढाई लढली. यामुळेच त्यांचा आजचा विजय साजरा होत आहे. नागपूरच्या मिहान प्रकल्पामुळे विदर्भातील व्यवसाय, उद्योग आणि कृषी क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच या प्रकल्पाला हिरवा कंदील दिल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पातून नागपूरला जागतिक स्तरावर ओळख मिळेल आणि स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे उपमुख्यमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकाश भोयर यांनी शिवणगावातील प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षाचा आढावा घेतला आणि त्यांच्या योगदानाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर भूखंड वितरणाच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बबनराव महाले, सागर महाले, संजय महाले, अजय महाले, सुरेश महाले, गजानन महाले, प्रविण वरणकर, संदीप वरणकर, शेषराव शहाणे, दशरथ शहाणे, रामचंद्र शहाणे, राजेंद्र नितनवरे, कविता भोंगाडे, पाडुरंग देशमुख, सरस्वताबाई ठाकरे, निर्मलाबाई ठाकरे, अशोक ठाकरे, सुनिल ठाकरे, रंगराव ठाकरे, शकुंतला, अतुल, अमोल ठाकरे, सुनिल झलके, सविता झलके, अशोक नेवारे, देवराव डेंगे, रमेश डेंगे, सुधाभाई डेंगे अशा प्रातिनिधिक लाभार्थ्यांना भूखंडांचे आवंटनपत्र देण्यात आले.
यावेळी महिलांची मोठी उपस्थिती होती. समारंभात महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळातर्फे कामगारांना कीटचे वितरण देखील करण्यात आले. शिवणगावातील नागरिकांच्या संयमाने, एकत्रित प्रयत्नांनी आणि शासनाच्या सक्रिय भूमिकेमुळे अखेर त्यांच्या संघर्षाला यश आले असून, भविष्यात नागपूरच्या विकासामध्ये त्यांचे योगदान सदैव अधोरेखित राहील.