नाशिक: नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून इच्छुक उमेदवार आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कामगार नेते जगदीश गोडसे व मित्र परिवाराच्यावतीने भव्य स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात गोडसे यांच्या कर्तृत्व, समाजसेवा, आणि कामगार हितांसाठी त्यांनी केलेल्या कार्याचे जोरदार कौतुक करण्यात आले. उपस्थितांनी एकत्रितपणे गोडसे यांना उमेदवारी द्यावी, असा ठाम निर्धार व्यक्त करताना विधानसभेत त्यांचे प्रतिनिधित्व मतदारसंघासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
मेळाव्यात उपस्थित असलेल्या समर्थकांनी एकत्रितपणे गोडसे यांचे कर्तृत्व, हुशारी आणि समाजसेवेतील योगदानाचे कौतुक केले. गोडसे यांनी कामगारांच्या समस्या सोडवण्याबाबत केलेले प्रयत्न आणि त्यांची अभ्यासू वृत्ती याचा उल्लेख करत, ते विधानसभेत प्रतिनिधित्व करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवले जातील, असा विश्वास या मेळाव्यात दिसून आला.
मेळाव्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी , “जगदीश गोडसे यांच्या नेतृत्वाखाली आपण नाशिक पूर्व मतदारसंघाचे विकासाचे स्वप्न साकार करू शकतो. त्यांच्या अनुभवाचा आणि कर्तृत्वाचा लाभ विधानसभेत झाल्यास, अनेक समस्यांचे निराकरण होईल.” यावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील गोडसे यांना पूर्ण पाठिंबा दर्शवत त्यांना विधानसभेत पाठवण्याचे आवाहन केले.
गोडसे यांचे सर्वसामान्यांशी असलेले जवळचे संबंध, त्यांची प्रामाणिकता आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढण्याची तयारी यामुळे ते नाशिक पूर्व मतदारसंघासाठी योग्य उमेदवार ठरतात, असे मत स्नेहमेळाव्यातील अनेकांनी मांडले. “आम्ही त्यांना विजयी करू आणि मतदारसंघाच्या समस्यांना कायमचा पूर्णविराम देऊ,” असेही मतप्रदर्शन यावेळी करण्यात आले.