एसटी महामंडळाच्या ३०४ व्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्यात एसटी महामंडळाने ई-शिवनेरी बस सेवेमध्ये नवीन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर होस्टेसच्या धर्तीवर, मुंबई-पुणे मार्गावरील ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांची सेवा करण्यासाठी ‘शिवनेरी सुंदरी’ नेमली जाणार आहे. हे आदरातिथ्य व्यवस्थापनावर आधारित असेल, ज्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास अनुभवता येईल.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
महत्त्वाचे म्हणजे, यासाठी प्रवाशांच्या तिकिटांवर कोणताही अधिभार लावला जाणार नाही.या बैठकीत ७० पेक्षा अधिक विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून स्व. आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ एसटीच्या ३४३ बस स्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’ सुरू करण्याची योजना आहे. या केंद्रांमध्ये माफक दरात आरोग्य तपासणी आणि औषध सेवा प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.
तसेच, चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आणि अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासी भागांत एसटीचे नवे आगार उभारले जाणार आहेत, ज्यामुळे आगारांची एकूण संख्या २५३ होईल. महिला बचत गटांसाठी प्रत्येक बस स्थानकांवर चक्रीय पद्धतीने १०x१० आकाराचे स्टॉल उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, ज्यामुळे स्थानिक पदार्थ विक्रीला चालना मिळणार आहे. शिवाय, एसटी महामंडळाने नवीन २५०० साध्या बसेस खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याची तसेच १०० डिझेल बसेसचे इलेक्ट्रिक बसेसमध्ये रूपांतर करण्याची योजना आखली आहे.