सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत सन 2024-25 च्या जिल्हा वार्षिक योजनेसाठी एकूण 857.28 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यात सर्वसाधारण योजनेसाठी 702 कोटी, अनुचित जाती उपयोजनांसाठी 151 कोटी आणि आदिवासी उपयोजनांसाठी 4.28 कोटी रुपये मंजूर आहेत. सध्या 333.27 कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध असून 323.55 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, लवकरच निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने सर्व कामांची निविदा प्रक्रिया त्वरीत पूर्ण होणे आवश्यक आहे.
या योजनेअंतर्गत कृषी आणि संलग्न सेवा, ग्राम विकास, नागरी क्षेत्राचा विकास, पाटबंधारे, ऊर्जा विकास, रस्ते विकास, सामान्य शिक्षण, आरोग्य आणि पर्यटन क्षेत्र यांसाठी निधीचा योग्य वापर करण्यावर जोर देण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील विकासकामांसाठी तरतूद केलेला निधी वेळेत आणि प्रभावीपणे वापरण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.