Latest News- राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांत जाहीर होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या धोरणांवर जोरदार टीका केली. या परिषदेत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवत राज्यातील सामान्य माणसांच्या अडचणींवर सरकारने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप केला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर केलेल्या टीकेचा मुख्य मुद्दा म्हणजे सरकारकडून सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांना घेऊन केलेल्या जाहिराती होत्या. त्यांनी म्हटले की, “राज्यात एकीकडे सामान्य माणूस विविध अडचणींशी सामना करत असताना, दुसरीकडे सरकार लाखोंची जाहिरातबाजी करत आहे. मोठ्या कलाकारांना घेऊन कितीही जाहिराती केल्या तरी सरकारचा खरा चेहरा लपणार नाही.” ठाकरे यांनी या जाहिरातींना ‘ग्लॅमर शील्ड’ म्हणून संबोधले आणि सरकारवर लोकांच्या समस्यांपासून दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.
ठाकरे यांनी गद्दारांच्या सुरक्षेवरही जोरदार टीका केली. “गद्दारांना सुरक्षा कशासाठी पुरवली जात आहे?” असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, “पोलिसांचा वापर गद्दारांच्या सुरक्षेसाठी केला जात आहे, तर सामान्य माणसासाठी किती पोलीस उपलब्ध आहेत? याबाबत आरटीआयद्वारे माहिती काढायला हवी.” ठाकरे यांनी उपरोधिकपणे सरकारला लक्ष केले, “सत्ताधाऱ्यांच्या घरात धुणी-भांडी करणाऱ्यांनाही सुरक्षा दिली गेली आहे.”
तसेच, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे युवा नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा उल्लेख करत, “आमच्या युवा नेत्याची हत्या झाली, पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला राजीनामा दिला नाही. त्यावेळी फडणवीस यांनी टिप्पणी केली होती की, गाडीखाली कुत्र्याचे पिल्लू आले तरी तुम्ही राजीनामा मागाल का? याचा अर्थ गृहमंत्र्यांना राज्यातील जनतेबद्दल काहीही पडलेले नाही,” अशी कडवट टीका ठाकरे यांनी केली.
महाराष्ट्रात दोन पोलीस आयुक्त असण्याच्या निर्णयावर टीका करत ठाकरे म्हणाले, “मुंबईत दोन पोलीस आयुक्त आहेत, आणखी पाच नेमले तरी काही फरक पडणार नाही, पण राज्यात महिलांपासून राजकारण्यांपर्यंत कोणताही सुरक्षित नाही. महिला नेत्यांवर होणारे हल्ले आणि त्यांच्यावरील असुरक्षिततेच्या घटनांवर सरकारने दुर्लक्ष केले आहे.”
मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चेवर उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले की, “महाविकास आघाडीला मुख्यमंत्रीपद महत्त्वाचे नाही, तर राज्याच्या जनतेचे हित महत्त्वाचे आहे.” ठाकरे यांनी महायुतीवर टीका करत म्हटले, “महायुतीने आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा आणि हे स्पष्ट करावे की ते गद्दारांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविणार आहेत का?”
पत्रकार परिषदेत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी एकत्रितपणे महाविकास आघाडीची भूमिका मांडली आणि महायुतीच्या जाहिरातींवर जोरदार टीका केली.