Latest News : शिव ठाकरे हा नावाजलेला रिअॅलिटी शो स्टार असून ‘रोडीज’, ‘बिग बॉस मराठी’ आणि हिंदी ‘बिग बॉस’ या शोमधून तो प्रचंड लोकप्रिय झाला आहे. शिवने त्याच्या सरळ आणि साध्या स्वभावाने सर्वांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्याची लोकप्रियता आता केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर पसरली आहे. शिव त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतो आणि अलीकडेच त्याने त्याच्या आजीच्या वाढदिवसाचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, जो खूपच गाजत आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
शिवचा आजीसोबतचा गोड क्षण
या व्हिडीओत, शिवने आपल्या लाडक्या आजीचा वाढदिवस साजरा केला. व्हिडीओची सुरुवात शिव आपल्या आजीला हाताला धरून गाडीत बसवत आहे, यानंतर ते दोघं ‘गेटवे ऑफ इंडिया’कडे निघतात. वाटेत शिवची आजी आनंदाने सी-लिंक पाहत असते. त्यानंतर ‘गेटवे ऑफ इंडिया’च्या समुद्राजवळ शिव ठाकरे आपल्या आजीला बोटीवर नेतो आणि तिथे तिच्या वाढदिवसानिमित्त केक कापतो. बोट सजवलेली असून संपूर्ण वातावरणात आनंद पसरलेला दिसतो. आजीच्या वाढदिवसासाठी ही खास सजावट करण्यात आली होती. केक कापल्यावर शिव आणि त्याची आजी एकमेकांना मायेने मिठी मारतात, जे पाहून प्रेक्षकही भावुक होतात.
नेटकऱ्यांचा उत्साह आणि कौतुक
व्हिडीओमध्ये शिव आणि त्याच्या आजीचं खास बॉन्डिंग पाहायला मिळतं, ज्यामुळे चाहत्यांचा उत्साह दुप्पट झाला आहे. व्हिडीओला तासाभरात ७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीओला भरपूर कौतुक मिळत आहे. ‘बिग बॉस मराठी’ची विजेती मेघा धाडे हिनेदेखील शिवच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने “खूपच गोड, एकदम क्यूट तू आणि आजी” अशी कमेंट केली आहे.