Latest News : नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांचे वातावरण तापले असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात संघर्षाची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. गेल्या निवडणुकीत अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसने नाशकात सहा जागा जिंकल्या होत्या, भाजपने पाच आणि शिवसेनेने दोन जागा जिंकल्या. काँग्रेसने एक जागा मिळवली तर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एआयएमआयएम) यांनीही एक विजय मिळवला होता.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फूटामुळे नाशकातील शिवसेनेचे दोन आमदार शिंदे गटात आणि राष्ट्रवादीचे सहा आमदार अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. यामुळे आता महायुतीकडून विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्याची चर्चा सुरू आहे, तर महाविकास आघाडीने कोणत्या उमेदवारांना मैदानात उतरवायचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महायुतीने जागावाटपाचा निर्णय घेतला असून, अजित पवार यांच्या गटाला १५ पैकी सात जागा, भाजपला पाच आणि शिंदे गटाला दोन जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मालेगावमधील जागावाटप अद्याप बाकी असून, ही जागा अजित पवारांच्या गटाला जाणार असल्याची चर्चा आहे.
महाविकास आघाडीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. तथापि, जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. निफाड, येवला, कळवण आणि सिन्नर यांसारख्या मतदारसंघांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे, तरीही शरद पवार गटाला सहा मतदारसंघ मिळण्याची अपेक्षा आहे. उर्वरित जागा सीपीएमला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या निवडणुकांमध्ये मतदारांनी कोणाची बाजू घेतली हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, कारण दोन्ही आघाड्या आपापल्या पक्षांच्या विजयासाठी कंबर कसून तयारी करत आहेत.