Latest News : नाशिक..विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच, नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय वातावरण चांगलीच तापली आहे.यंदाच्या निवडणुकीत दोन नवीन राजकीय पक्षांचा उदय झाल्याने तिरंगी व चौरंगी लढती रंगणार असल्याचे चित्र आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, तसेच पालकमंत्री दादा भुसे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
महायुतीतून जिल्ह्यात अजित पवार गटाची प्रमुख भूमिका असणार असून, आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट ‘मोठा भाऊ’ ठरण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पवार काका-पुतण्याच्या उमेदवारांमध्ये संघर्ष बघायला मिळू शकतो .
यामध्ये येवला, इगतपुरी, दिंडोरी, आणि निफाडमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील वादामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष येवला येथील लढतीकडे लागले आहे. गेल्या चार निवडणुकांपासून भुजबळांचे मताधिक्य वाढत असले तरी, यावेळी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. छगन भुजबळ स्वतः लढणार की, माजी खासदार समीर भुजबळ रिंगणात उतरतील याबाबत उत्कंठा आहे.
इगतपुरीमध्ये आचारसंहितेपूर्वीच आमदार हिरामण खोसकर यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे हा मतदारसंघ आता अजित पवारांकडे जाणार असल्याची चर्चा आहे. मविआ कडून येथे अनेक उमेदवार इच्छुक असले तरी, दुरंगी लढत होण्याचीच शक्यता आहे.
दिंडोरीत नरहरी झिरवाळ अजित पवार गटाचे विद्यमान आमदार असून, ते शरद पवार गटाकडून लढणार की अजित पवार गटाकडून याची उत्सुकता आहे. झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी शरद पवार गटाकडून उमेदवारी मागितली आहे.
निफाड मतदारसंघात विद्यमान आमदार दिलीप बनकर यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांची साथ घेतल्यामुळे बनकर विरुद्ध माजी आमदार अनिल कदम यांच्यात सामना होणार आहे. कदम ठाकरे गटात असले तरी, ऐनवेळी ते ‘तुतारी’ वाजविण्याची शक्यता आहे.
सिन्नरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांच्यासमोरील उमेदवार शरद पवार गटाचा किंवा ठाकरे गटाचा असणार यावर मतदारसंघातील लढतीचे संभाव्य चित्र अवलंबून राहणार आहे. शरद पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड इच्छुक आहेत, तर ठाकरे गटाकडून खासदार राजाभाऊ वाजेंच्या पत्नी दीप्ती वाजेंच्या नावाची चर्चा आहे.
कळवण मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार विरुद्ध माकपचे माजी आमदार जिवा पांडू गावित यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे. चांदवड मतदारसंघात भाजपचे डॉ. राहुल आहेर यांना भाऊबंदकीच्या संधीसाठी झगडावे लागणार आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी मतदारसंघावर दावा ठोकल्याने काय होणार याचीच उत्सुकता आहे.
मालेगाव बाह्य मतदारसंघात पालकमंत्री दादा भुसेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चारवेळा निवडून आलेल्या भुसेंसमोर ठाकरे गटाचे अद्वय हिरेंनी कडवे आव्हान उभे केले आहे. भुसेंचे कट्टर समर्थक बंडूकाका बच्छाव यांनी अपक्ष उमेदवारीची तयारी केल्याने तिरंगी लढतीची शक्यता आहे.
बागलाण मतदारसंघात भाजपचे दिलीप बोरसे यांच्यासमोर भाजपच्याच माजी मंत्री डॉ. भारती पवार यांचे आव्हान उभे राहू शकते. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास बोरसे अपक्ष लढण्याची शक्यता आहे.
मालेगाव मध्यमात ‘एमआयएम’चे मौलाना मुफ्ती तिसऱ्यांदा नशीब आजमावणार आहेत, तर समाजवादी पक्षाकडून शान-ए-हिंद, आसिफ शेख अपक्ष लढण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात तिरंगी आणि चौरंगी लढतींची चुरस अनुभवायला मिळणार आहे. राजकीय वातावरण तंग असून, विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे.