Latest News :राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आचारसंहितेच्या लागू झाल्यानंतर राज्यभर विविध ठिकाणी नाकाबंद्या केल्या जात असून, वाहनांची तपासणी सुरू आहे. पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात नाकाबंदीत पोलिसांनी खासगी वाहनातून अंदाजे पाच कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “२५-२५ कोटी रुपये दिले जात असल्याची चर्चा आहे, आणि एक गाडी खेड-शिवापूरच्या डोंगर झाडीमध्ये सापडली. पण अजून चार गाड्या कुठे आहेत?” हे विचारले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही, यावर सत्ताधाऱ्यांनी लक्ष द्यावे.
रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून २५-२५ कोटी रुपये दिले जात आहेत. एक गाडी सापडली, पण अजून चार गाड्या कुठे आहेत? लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला आहे. विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे.”
माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, “पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात ५ कोटींची रोख रक्कम पोलिसांकडून जप्त करण्यात आली. असे बोलले जात आहे की, हे पैसे सत्ताधारी आमदारांचे आहेत. खेड-शिवापूरच्या डोंगरांमध्ये आणि झाडांमध्ये या पैशांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांना एकच गाडी सापडली आहे, मात्र अंदाज आहे की, पाच गाड्या होत्या. या घटनेत अंदाजे २५ ते ३० कोटी रुपये असू शकतात.”
रोहित पवार यांचे आरोप अधिक गंभीर बनत आहेत, कारण त्यामध्ये त्यांनी महायुतीच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराचा उघडावा घेतला आहे. “महायुतीने लोकसभेमध्ये पाण्यासारखा पैसा वाटला आहे. आता विधानसभेलाही त्यामध्ये भाजपाचे आमदार, शिंदेंच्या शिवसेनेचे किंवा अजित पवारांच्या पक्षाचे आमदार असूद्या, त्यांच्यावर कमीत कमी ५० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे, अशी चर्चा आहे,” असे पवार म्हणाले.