नाशिक महानगरपालिकेने निवडणूक आचारसंहितेदरम्यान सुरू केलेल्या बॅनरमुक्त मोहिमेला मोठे यश मिळाले असून, या मोहिमेला निवडणुकीनंतरही सातत्याने पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. आचारसंहितेच्या काळात शहरात कोणत्याही प्रकारचे अनधिकृत पोस्टर्स, बॅनर, किंवा फलकबाजी करण्यास मनाई करण्यात आली होती. यानंतर आता निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार व राजकीय पक्षांकडून अभिनंदनासाठी लावण्यात येणाऱ्या अनधिकृत फलकांवरही पालिकेने कडक पाऊल उचलले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
महापालिकेच्या अनुज्ञप्ती विभागाने सर्व सहा विभागीय कार्यालयांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत फलक, बॅनर, किंवा पोस्टर्स तातडीने हटवावे. यासाठी गरज भासल्यास स्थानिक पोलिस बंदोबस्त तैनात करून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मोहीमेचे स्वरूप:
- प्रत्येक विभागाने आपल्या क्षेत्राची तपासणी करून अनधिकृत फलक ओळखावे.
- त्वरित काढून संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचा अहवाल सादर करावा.
- कारवाईदरम्यान छायाचित्रण व चित्रफित तयार करून मुख्य कार्यालयात पाठवावी.
न्यायालयाचे निर्देश:
मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच बेकायदा फलकबाजीविरोधात कठोर पाऊले उचलण्याचे निर्देश दिले होते. १८ नोव्हेंबरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने काही पालिकांकडून दुर्लक्ष होत असल्याबद्दल संताप व्यक्त केला होता. या निर्देशांच्या अनुषंगानेच नाशिक महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
मयूर पाटील, उपायुक्त, नाशिक मनपा यांनी सांगितले की, “शहर बॅनरमुक्त ठेवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. नागरिकांनीही यामध्ये सहकार्य करावे.”