नाशिक : माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात जनजागृतीची प्रभावी साधने आणि कर्तव्याविषयी सतर्कता वाढल्याने वर्षभरात जिल्ह्यात एक लाख ८४ हजार ५२९ मुलींनी मतदारयादीत नाव सामविष्ट केले आहे. जिल्ह्यात मतदारांच्या लिंगगुणोत्तर प्रमाणात वाढ झाली असून, दर हजार पुरुष मतदारांमागे जिल्ह्यात ९३७ महिला मतदारांची नोंद आहे. गेल्या वर्षी १ जानेवारीला हे प्रमाण केवळ ९१८ इतके होते. केंद्राने लोकसभा-राज्यसभा तसेच विधानसभेमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण बहाल केले आहे.
२०२९ मध्ये होणाऱ्या निवडणुकांपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. राजकारणात महिलांचे स्थान बळकट करण्यासाठी शासनाने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पण त्यासोबत सर्वसामान्यांमध्ये निवडणुका, मतदानाचा हक्क याबद्दलही मोठ्या प्रमाणावर जागृती झाल्याचे दिसून येत आहे. विशेषकरून महिलांमध्येही मतदान हे राष्ट्रीय कर्तव्याबाबत अधिक जागरूकता वाढली असून, त्या मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी स्वयंस्फूर्तीन पुढे येत आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
१ जानेवारी २०२५ ला जिल्ह्याची मतदारसंख्या ५० लाख ९३ हजार २८४ पोहोचली. त्यामध्ये २६ लाख २९ हजार १५ पुरुष, तर २४ लाख ६४ हजार १३६ महिला मतदारांची नोंद आहे. तृतीयपंथी मतदारांची संख्या १३३ इतकी आहे. १ जानेवारी २०२४ ला जिल्ह्यात एकूण ४७ लाख ६२ हजार २५६ मतदार होते. त्या तुलनेमध्ये वर्षभरात जिल्ह्यात तीन लाख ३१ हजार २८ नवमतदार वाढले आहेत. विशेष म्हणजे नवमतदारांमध्ये एक लाख ८४ हजार ५२९ महिला आहेत.
लिंगगुणोत्तर ९१८ वरून ९३७
गेले वर्ष हे निवडणुकांचे ठरले. या कालावधीत जिल्हा प्रशासनाने मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करत गावोगावी विविध उपक्रम राबविले. या प्रयत्नांना यश लाभले असून, आदिवासी तालुक्यांमध्येही महिला नावनोंदणीसाठी पुढे आल्या. त्यामुळे जिल्ह्यात मतदारांच्या लिंगगुणोत्तर प्रमाणात वाढ झाली आहे. दर हजार पुरुष मतदारांमागे जिल्ह्यात ९३७ महिला मतदार नोंद आहे. गेल्या वर्षी १ जानेवारीला हे प्रमाण ९१८ इतके होते.