नाशिक – Nashik Crime News – सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवत एका बेरोजगार तरुणाला तब्बल १२ लाख रुपयांना गंडविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तहसीलदार पदावर नियुक्ती मिळवून देतो, अशा खोट्या आश्वासनाने संशयितांनी दोन वर्षांपासून तरुणाची दिशाभूल केली. अखेर नोकरी न मिळाल्याने व पैसेही परत न मिळाल्याने संबंधित तरुणाने मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
आरोपींची नावे व तक्रार तपशील: (Nashik Crime News)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अतुल पेठकर, वजीर मुजावर आणि सोनाली मॅडम या तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अक्षय अनिल झवर (वय २४, रा. ढिकलेनगर, पंचवटी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी २०२४ मध्ये त्यांच्या आरोपींसोबत ओळख झाली होती.
संशयितांनी शासनातील उच्च अधिकाऱ्यांशी घनिष्ट संबंध असल्याचे भासवले व त्याच्या बदल्यात झवर यांना तहसीलदार पदावर थेट नियुक्ती देण्याचे आमिष दाखवले. यासाठी त्यांनी झवरकडून १२ लाख रुपये रोख व ऑनलाईन स्वरूपात उकळले.
नोकरी नाही, पैसेही नाही:
सुमारे दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी ना सरकारी नोकरी मिळाली, ना पैसे परत मिळाले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच झवर यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोडे करत आहेत.